शिवसेना हा आता बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष राहिला नाही. शिवसेनेने आता हिंदुत्व सोडलं आहे आता ती सुडो सेक्युलर झाली आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शिवसेना मतपेटीचं राजकारण करते आहे असाही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या अजान स्पर्धे संदर्भात दिलेल्या सल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. यावरुनच देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना हा पक्ष आता बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष राहिला नाही असं म्हटलं आहे.

शिवसेना आता व्होट बँकेचं राजकारण करते आहे. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा शिवसेनेने नाकारली आहे. पांडुरंग सकपाळ यांनी अजान स्पर्धेचं आयोजन करण्याबद्दल म्हटलं आहे याबाबत आता संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी बोललं पाहिजे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाळासाहेब ठाकरे कायमच बोलत राहिले आणि लढत राहिले. बाळासाहेब ठाकरेंनी सामनात लिहिलेल्या लेखांच्या अगदी उलट भूमिका आता शिवसेनेने घेतली आहे. शिवसेना हा पक्ष आता बाळासाहेब ठाकरेंचा राहिला नाही. आम्ही कधीही मुस्लिम समाजाकडे व्होट बँक म्हणून पाहिलेले नाही. तसेच आम्हाला तुष्टीकरणाचे राजकारण नको. सबका साथ, सबका विकास हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नारा आहे. यामध्ये मुस्लिम समाजही येतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

काय आहे वाद?

दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरुंग सकपाळ यांनी अजना स्पर्धा आयोजित केल्याने विरोधकांनी शिवसेनेच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. विरोधकांनी शिवसेनेची कोंडी करण्यास सुरुवात केल्यानंतर पांडुरंग सकपाळ यांनी खुलासा करत अजान स्पर्धेशी आपला संबंध नाही असा खुलासा केला आहे. अजानमुळे मनाला शांती लाभते, लहान मुलांना अजानची गोडी लागावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन केल्याचंही सकपाळ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. तसंच “महाआरतीप्रमाणेच अजानचं महत्त्व आहे. प्रेम आणि शांतीचं ते प्रतिक आहे. त्यावर वाद घालणं उचित वाटत नाही,” असंही ते म्हणाले होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. आता यावरच देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.