अवघ्या काही महिन्यांपूर्वीपर्यंत शिवसेना विरुद्ध भाजपा असा सुरू असलेला संघर्ष आता शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा झाला आहे. या दोन्ही बाजू एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे एकीकडे यांच्यातलं वाकयुद्ध रंगलेलं असताना दुसरीकडे भाजपाकडूनही आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या निमित्ताने शिवसेनेला लक्ष्य केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी ‘पेंग्विन सेना’ असा उल्लेख करत शिवसेनेवर केलेल्या टीकेला आता पक्षाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

काय म्हणाले होते आशिष शेलार?

हरित लवादाने पर्यावरणविषयक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी राज्य सरकारला तब्बल १२ हजार कोटींचा दंड केला आहे. यावरून आशिष शेलार यांनी ट्वीट करून शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. “हा दंड दोन महिन्यांत भरायचा आहे. मग आता सांग सांग भोलानाथ..हा दंड पालिकेत सत्ता असलेल्यांकडून, अडीच वर्षं पर्यावरण मंत्री असलेल्यांकडून, सोशल मीडियावर पर्यावरण प्रेमाची झाडे लावणाऱ्या पेंग्विन सेनाप्रमुखांकडून वसूल करायचा का?” असा खोचक सवाल आशिष शेलार यांनी ट्वीटमधून केला आहे.

“आशिष शेलारांचं डोकं ठिकाणावर आहे का?”

दरम्यान, यासंदर्भात मुंबईत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी टीकास्र सोडलं आहे. “आशीष शेलार महापालिकेत काम करून गेले आहेत. कधीकधी प्रश्न पडतो की आशिष शेलारांचं डोकं ठिकाणावर आहे का?” असा खोचक सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

“ज्या मुलीने १३व्या वर्षी घाणेरड्या चित्रपटातून…”, नवनीत राणांवर किशोरी पेडणेकरांचं टीकास्र!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मुंबई महापालिकेनं कचरा व्यवस्थेवर अनेकदा काम केलंय. त्याचं शेलारांनी स्वत: कौतुक केलं आहे. पण प्रत्येक वेळी सोयीनुसार शब्द फिरवणारे कुणी असतील तर ते आशिष शेलार आहेत. म्हणून मला वाटतं की ते डोक्यावर पडलेत का?” असा सवाल पेडणेकरांनी केला आहे. तसेच, यावर बोलताना “कधी बाजूच्या गल्लीत मांजरीनं बाळं दिली, तरी ते म्हणतील की शिवसेनेमुळे झाली. इतकं डोकं फिरलंय त्यांचं”, असंही पेडणेकर म्हणाल्या.