मशिदींवरील भोंग्यांवरून सध्या राज्यातलं राजकारण तापलेलं असताना दुसरीकडे मनसे आणि शिवसेना यांच्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी या कारवाईबाबत टीका करतानाच “सत्तेचा ताम्रपट कुणाच्याही हाती नसतो. उद्धव ठाकरे, तुमच्याही हातात नाही. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका”, असा इशारा देखील दिला आहे. यावरून आता शिवसेनेकडून मंत्री अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. प्रसारमाध्यमांनी राज ठाकरैंच्या पत्राविषयी विचारणा केली असता अनिल परब यांनी मनसेवर तोंडसुख घेतलं.

“विरोधी पक्षांना या गोष्टींना सामोरं जावं लागतं”

“पोलीस कारवाई होतच असते. ज्याला आंदोलन करायचं असतं, त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या बाबतीत हे होत असतं. त्यामुळे सत्तेचा जाणून-बुजून वापर कुणी करत नाही. विरोधातल्या राजकीय पक्षांना या सगळ्या गोष्टींना सामाोरं जावं लागतं. त्यामुळे सत्तेचा गैरवापर किंवा अंत पाहाणं हा विषय तसाही येत नाही”, असं अनिल परब म्हणाले.

Balasaheb Thorat
अशोक चव्हाणांच्या जाण्याने नांदेडमध्ये काँग्रेसला फटका बसणार? बाळासाहेब थोरात म्हणाले, “जर ते…”
Hindutva organization, BJP, Solapur,
सोलापुरात भाजपच्या पाठीशी हिंदुत्ववादी संघटना
Praniti Shinde, Solapur,
सोलापूरचे भाजपचे दोन्ही खासदार सतत दहा वर्षे नापासच, प्रणिती शिंदे यांची टीका
Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप

“आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, कुणीही…”; राज ठाकरेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खुलं पत्र, दिला ‘हा’ इशारा!

“आम्हीही आंदोलनं केली आहेत”

दरम्यान, यावेळी बोलताना अनिल परब यांनी शिवसेना कार्यकर्त्यांनी देखील आंदोलनं केल्याचं सांगितलं. “आम्ही देखील यापूर्वी आंदोलनं केली आहेत. आमच्या घरात देखील रात्री-अपरात्री पोलीस येऊन आम्हाला घेऊन जायचे. कधीकधी मारत मारत देखील घेऊन गेले आहेत. आंदोलकाला या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. हा पोलीस आणि आंदोलकांचा विषय असतो. यात सरकारचा काही विषय नसतो. पोलीस शिवसेनेचं सरकार आहे म्हणून कारवाई करतात आणि काँग्रेस किंवा भाजपाच्या काळात करत नव्हते अशातला भाग नाही. ते आंदोलकांना शोधायला कधीही जातात. कुठल्याही प्रकारच्या आंदोलनात एखादा गुन्हा घडतो, तेव्हा पोलीस त्यांची कारवाई करत असतात”, असं अनिल परब म्हणाले.

दरम्यान, राज ठाकरेंच्या पत्रावर मनसेला काय सांगाल, असं माध्यम प्रतिनिधींनी विचारताच अनिल परब म्हणाले, “मनसेला आवाहन करणारा मी कोण आहे? मी माझ्या पक्षाबद्दल बोलू शकतो. बाळासाहेब नेहमी सांगायचे की आंदोलन करत आहात तर दोन दिवस आतमध्ये जाण्याचीही तयारी ठेवा. ती तयारी ठेऊनच आम्ही आंदोलनं करायचो. अशा बऱ्याच आंदोलनांच्या वेळी आम्ही आतमध्ये जाऊन आलो आहे”.