शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर १०० दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांना ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने अटक केली होती. तेव्हापासून ते सीबीआय कोठडीत होते. दरम्यानच्या काळात संजय राऊतांकडून अनेकदा जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, प्रत्येक वेळी पीएमएलए न्यायालयाकडून राऊतांचा अर्ज फेटाळून लावला होता. अखेर आज न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्यानंतर शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांना जामीन मिळाला, हे ऐकून खूप आनंद झाला. संजय राऊत कुणाच्याही दबावापुढे झुकले नाहीत. हा त्यांच्या लेखणीचा विजय आहे, अशा शब्दांत चंद्रकांत खैरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलत होते.

यावेळी चंद्रकांत खैरे म्हणाले की, संजय राऊतांना अखेर १०० दिवसांनी जामीन मिळाला आहे. ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे, यासाठी मी न्यायपालिकेला खरोखर धन्यवाद देतो. संजय राऊत हे आमच्या शिवसेनेचे एकनिष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर कितीही दबाव आणला तरी ते डगमगले नाहीत, हा त्यांच्या लेखणीचा विजय आहे. मी मरून जाईन पण शिवसेना सोडणार नाही. मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे, मी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा नेता आहे, असं संजय राऊत कित्येकदा बोलले आहेत. त्याप्रमाणे संजय राऊत कणखर राहिले, अशी प्रतिक्रिया खैरेंनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा- Sanjay Raut Bail Granted: मोठी बातमी! संजय राऊत यांना जामीन मंजूर, पत्राचाळ प्रकरणी झाली होती अटक!

“बाकीचे जे गद्दार आहेत, त्यांनी संजय राऊतांचं उदाहरण घेतलं पाहिजे. आता ईडी आणि इतर तपस यंत्रणांच्या दबावापुढे हे सगळे (शिंदे गट) उघडे पडले आहेत. आज सत्याचा विजय झाला आहे. त्यासाठी मी संजय राऊतांचं मनापासून अभिनंदन करेन” असंही खैरे म्हणाले.