शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच फेसबूक लाइव्हद्वारे आपली भूमिका मांडली आहे. संबंधित भाषणातून त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन करत राजीनामा देण्याची तयारीही दर्शवली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या भाषणानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या अडीच वर्षात घडलेल्या चार मुद्द्यांच्या आधारे त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, “गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा केवळ घटक पक्षांना झाला. यामध्ये शिवसैनिक भरडला गेला. एकीकडे घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे आणि शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत गेलं,” असं त्यांनी म्हटलं आहे.

अन्य एक ट्वीट करत त्यांनी पुढे म्हटलं की, “पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणं अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचं आहे,” असंही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन करताना म्हटलं की. “समोर बसा. मी आज माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार ठेवतो आहे. हा कुठेही लाचारीचा प्रसंग नाही. मजबुरी तर अजिबात नाही. काय होईल जास्तीत जास्त? परत लढू. जोपर्यंत माझ्यासोबतच शिवसैनिक आहेत, तोपर्यंत मी कोणत्याही संकटाला भीत नाही. मी आज शिवसैनिकांनाही आवाहन करतोय. ही शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असं जे म्हणतात त्यालाही माझ्याकडे उत्तर आहे. जर शिवसेनेच्या कार्यकर्त्याला वाटत असेल की मी शिवसेना प्रमुख पद सांभाळायला नालायक आहे, तर मी शिवसेना प्रमुखपदही सोडेन. पण समोर येऊन सांगायला हवं. मी मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना प्रमुखपद सोडेन. मी मुख्यमंत्रीपद सोडून पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होत असेल, तर मला आनंद आहे. पण एकदा मला समोर येऊन सांगा. समोर या, आणि सांगा”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.