राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही भाजपाने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. पुरेशी मते नसतानाही भाजपाचे पाचही उमेदवार विजयी झाले. शिवसेना आणि काँग्रेसची मते फुटल्याने भाजपाचा विजय सुकर झाला. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला असून महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. काही तास नॉट रिचेबल राहिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीन प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे.

“शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडावी आणि भाजपासोबत सरकार स्थापन करावं, असा पहिला प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचं समजत आहे. तर आगामी नवीन सरकारमध्ये भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील, असा दुसरा प्रस्ताव आहे. उपमुख्यमंत्रीपद मिळालं तरच एकनाथ शिंदे गट शिवसेनेत राहील, असा तिसरा प्रस्ताव असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतचं वृत्त टीव्ही ९ मराठीने दिलं आहे.

खरंतर, काल सायंकाळी निकाल विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे इतर काही आमदारांसह नॉट रिचेबल झाले होते. त्यांच्याशी कसल्याही प्रकारचा संपर्क होत नव्हता. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३५ आमदार असल्याची माहिती मिळत आहेत. शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत. तर माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय राठोड वाटाघाटी करण्यासाठी सुरतला जाणार असल्याचीही माहिती मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेतीन मोठ्या गटाने अशाप्रकारे बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. शिवसेना पक्ष वाचवायचा की महाविकास आघाडी सरकार वाचवायचं असा पेच सध्या मुख्यमंत्र्यांसमोर आहे. सायंकाळी होणाऱ्या बैठकीत चर्चा फिसकटली तर एकनाथ शिंदे वेगळा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.