शंभर कोटींच्या खंडणीप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी मध्यरात्रीनंतर अटक केली. त्यानंतर आता यावरुन राज्यातील राजाकरण चांगलेच तापल्याचे चित्र दिसत आहे. आर्थिक गैरव्यवहार किंवा बेनामी मालमत्ताप्रकरणी अटक वा शिक्षा झालेले अनिल देशमुख हे अलीकडच्या काळातील राज्यातील आठवे नेते आहेत. मात्र अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब आणि अन्य मंत्री व नेत्यांवर कारवाई होणार असल्याचा दावा भाजपाच्या नेत्यांकडून केला जात आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याप्रकारे असा दावाही केलाय. मात्र असं असतानाच आता एका अनिलकडून दुसऱ्या अनिलकडे असा प्रचार करणाऱ्या भाजपा नेत्यांबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांच्या तोडून अपशब्द निघाला आहे.

राऊत यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनिल देशमुखांवरील कारवाईनंतर आता अनिल परबांवरील कारवाईसंदर्भात चर्चा सुरु असल्याचा प्रश्न विचारण्यात आला. “आता असं म्हटलं जातंय की अनिल देशमुखांनंतर अनिल परब यांचा नंबर आहे. भाजपाचे नेते समाज माध्यमांवर बोलू लागले आहेत. एका अनिलपासून दुसऱ्या अनिलच्या अटकेपर्यंतचा प्रवास याबद्दल बोलू लागलेत, याबद्दल…” असा पत्रकाराचा प्रश्न पूर्ण होण्याआधी राऊत यांनी असे दावे करणारे, “माझ्या भाषेत बोलायचं तर ते लोक चु** आहेत,” असं म्हटलं आहे. “चु** हा शब्द अनेकदा बाळासाहेबांनीही वापरलाय. चु** चा अर्थ मुर्ख,” असंही पुढे बोलताना संजय राऊत म्हणालेत.

संतापलेल्या स्वरामध्येच राऊत यांनी, “तुम्ही कोण आहात? केंद्रीय तपास यंत्रणा तुमच्या बापाच्या आहेत का? हा आत जाईल, तो आत जाईल. तुमच्या बापाच्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत का? तुम्ही आता स्वत:ला संभाळा. तुम्ही कधी तुरुंगात जाणार आहात त्या तारखा आम्ही सांगतो,” असंही म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना, आम्हालाही माहितीय. पण या पातळीवर आम्ही उतरायंच का? आम्ही नाही उतरणार. महाराष्ट्राची प्रतिष्ठा, परंपरा, संस्कृती आम्हाला जपायची आहे,” असं राऊत यांनी भूमिका मांडताना स्पष्ट केलं.

तसेच “बोंबलणारे सर्व बाहेरुन आलेले लोक आहेत. भाजपामधले हे ओरडणारे लोक मूळचे लोक आहेत का?,” असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केलाय. “मुनगंटीवार, शेलार, फडणवीस हे मूळचे भाजपाचे लोक आहेत. त्यांना आम्ही देऊ उत्तर. पण हे हौसे, नौसे, गौसे, नाचे बाहेरुन आलेत त्यांना काय माहिती भाजपा. आम्ही अटलजींसोबत काम केलेले लोक आहोत. अडवाणीजी, मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत आम्ही काम केलंय. भाजपासोबत आमचा संबंध जुना होता आणि आहे. केंद्रात सत्ता असेपर्यंत हे भाजपात असणार. आज जे बोलतायत त्यातला एकही माणूस २०२४ मध्ये भाजपामध्ये नसेन,” असंही राऊत म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंगळवारी लागलेल्या पोट निवडणुकींच्या निकालांबद्दल बोलताना, हे निकाल २०२४ साली केंद्रात परिवर्तन होईल असं दर्शवत असल्याचं राऊत म्हणालेत. तसेच, “तेव्हा आज जे नाचे नाचतायत महाराष्ट्रात त्यांच्या पायात घुंगरु कसे बांधायचे ते आम्ही ठरवणार. हे संजय राऊत सांगताय हे लिहून ठेवायचं,” असा इशाराही राऊत यांनी दिलाय.