scorecardresearch

“बाळासाहेबांनी राणेंना अक्षरश: हाकलून दिलं” शिवसेना नेत्याची बोचरी टीका, बैठकीतील ‘त्या’ प्रसंगाचाही केला उल्लेख

शिवसेनेचे माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी नारायण राणेंच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे.

“बाळासाहेबांनी राणेंना अक्षरश: हाकलून दिलं” शिवसेना नेत्याची बोचरी टीका, बैठकीतील ‘त्या’ प्रसंगाचाही केला उल्लेख
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व भाजपा नेते नारायण राणे (संग्रहित फोटो)

शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केली आहे. शिंदे गटाने भारतीय जनता पार्टीसोबत सरकार स्थापन केल्यानंतर ठाकरे गटातील नेते सातत्याने शिंदे गटावर टीका करत आहेत. प्रत्येक सभा आणि भाषणात शिंदे गटातील आमदार आणि खासदारांचा उल्लेख ‘गद्दार’ असा केला जात आहे. नवीन सरकार स्थापन होऊन आता जवळपास दोन महिने पूर्ण झाली आहेत. पण अजूनही शिंदे आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर गद्दारी केल्याचे आरोप केले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणेही सातत्याने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना दिसत आहेत. शिंदे गटाने गद्दारी केली नाही तर, उद्धव ठाकरे यांनीच शिवसेना आमदार आणि पक्षाशी खरी गद्दारी केली. त्यांनी गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं, अशी टीका नारायण राणे यांनी केली होती.

शिवसेनेचे माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी नारायण राणेंच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. नारायण राणेसारख्या माणसाने महाराष्ट्रातील जनतेला गद्दारी कुणी केली? याबाबत शिकवू नये. बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना अक्षरश: हाकलून दिलं होतं. मातोश्रीच्या जीवावर मोठं झालेल्या राणेसारख्या लोकांनी म्याव म्याव करू नये, अशी बोचरी टीका चोथे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी राणेंना हाकलून दिलेल्या बैठकीचादेखील उल्लेख केला आहे. ते जालन्यात एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हेही वाचा- पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करतील? एकनाथ खडसेंचं स्पष्ट विधान, म्हणाले…

संबंधित प्रसंगाबाबत बोलताना शिवाजीराव चोथे म्हणाले की, “नारायण राणे आणि मी १९९५ साली एका सरकारमध्ये होतो. ते एक मंत्री होते. त्यानंतर ते मुख्यमंत्री कसे झाले? हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कुणी कुणाशी गद्दारी केली? हे राणेसारख्या माणसानं महाराष्ट्रातील जनतेला शिकवू नये. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिक हे वाघ आहेत. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे सारख्या वाघाचा बछडा आहेत. त्यामुळे मातोश्रीच्या जीवावर मोठं झालेल्या राणेसारख्या लोकांनी म्याव म्याव करण्याची आवश्यकता नाही.”

हेही वाचा- नाशिक : महानुभाव संमेलनात खडसे-फडणवीस एकाच मंचावर, खडसेंच्या भाषणानंतर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा

“राणे हा शिवसेनेतून हाकलून दिलेला माणूस आहे, हे साऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे. बाळासाहेबांनी राणेंना अक्षरश: हाकलून दिलं होतं. त्या बैठकीला मी स्वत: उपस्थित होतो. शिवसेनेतून हाकलून दिल्यानंतर त्या माणसानं एक संघटना आणि मग भाजपात प्रवेश केला. त्यामुळे अशा माणसानं उद्धव ठाकरेंबद्दल बोलणं फारसं उचित आहे, असं मला वाटत नाही. बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरे हे खऱ्या अर्थानं बछडा आहेत” अशी बोचरी प्रतिक्रिया शिवाजीराव चोथे यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या