नाशिक येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर भगवान श्री चक्रधर स्वामी यांच्या अष्टशताब्दी जन्मोत्सवानिमित्त अखिल भारतीय महानुभाव संमेलन आजपासून सुरू झालं आहे. पुढील तीन दिवस हे संमेलन चालणार आहे. आज पहिल्याच दिवशी व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे उपस्थित होते. भाजपा नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या गर्दीत एकनाथ खडसे व्यासपीठावर एकटेच होते. त्यामुळे ते काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी आपल्या भाषणातून राजकीय विधान टाळलं आहे. आम्ही राजकीय विचारांच्या चपला बाहेर सोडून व्यासपीठावर आलो आहोत, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी महानुभाव पंथाच्या विचारसरणीवर प्रकाश टाकला. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात महानुभाव पंथापासून झाल्याचं सांगितलं. हेही वाचा- “सुजित पाटकर पळून जाणार” कोविड केंद्रातील घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांचं मोठं विधान याबाबत एक किस्सा सांगिताना एकनाथ खडसे म्हणाले की, "१९९० साली जेव्हा मी पहिल्यांदा निवडणूक लढवली, तेव्हा महानुभाव पंथाच्या माध्यमातून माझ्या विजयाचा विडा ठेवण्यात आला. संबंधित मतदार संघात गेल्या ५० वर्षात जे घडलं नाही, विरोधी पक्षाचा उमेदवार कधीही निवडून आला नाही, अशा मतदारसंघात नाथाभाऊ पहिल्यांदा निवडून आला. महानुभाव पंथाने माझ्या विजयाचा विडा ठेवला आणि चमत्कार घडला, मी त्याठिकाणी २३०० मतांनी निवडून आलो. वरचे सर्व मते तुमची होती, म्हणून आज नाथाभाऊ उभा राहिला आहे." हेही वाचा- “तुम्ही सत्तेच्या नशेत…” दिल्ली सरकारच्या मद्य धोरणावरून अण्णा हजारेंची केजरीवालांवर बोचरी टीका "या राज्यात समृद्धी यावी. चक्रधर स्वामींनी दिलेल्या ज्ञानाप्रमाणे आपण सर्वांनी एकत्र राहावं. त्या स्वरुपाचं जीवन आपण एकमेकांनी जगावं. आपसातील मतभेद विसरावेत, धर्मांतील मतभेद विसरावेत" अशी अपेक्षा एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. आपल्या भाषणानंतर एकनाथ खडसे यांनी आपले कट्टर विरोधक असणाऱ्या गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. व्यासपीठावरच त्यांच्यात काही क्षण चर्चाही झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एक वेगळं चित्र पाहायला मिळालं आहे.