एकीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते भाजपा आणि शिवसेनेत जोरदार प्रवेश करणार असताना शिवसेनेच्या माजी आमदाराने नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. औरंगाबादमधील गंगापूर खुलताबाद विधानसभेचे दहा वर्ष शिवसेनेचे आमदार राहिलेले अण्णासाहेब माने. आणि त्यांचे पुत्र संतोषमाने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
गंगापूर खुलताबाद विधानसभेची जागा भाजपाकडे गेल्यामुळे तिकीटासाठी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची चर्चा मराठवाड्याच्या राजकारणामध्ये सुरू आहे. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत माने पिता-पुत्रांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अण्णासाहेब माने यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
शिवसेना-भाजपाच्या युतीच्या जागावाटपानंतर दोन्ही पक्षांमधील बंडखोरी समोर आली आहे. शिवसेनेकडून इच्छूक असलेले माने यांनी बंड पुकारत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. गंगापूर विधानसभा मतदारसंघ शिवसनेने भाजपाचे विद्यमान आमदार प्रशांत बंब यांच्यासाठी सोडल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे समोर आले आहे. माने पिता-पुत्रांच्या बंडामुळे मराठवाड्यामध्ये शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय. सुत्रांच्या माहितीनुसार, गंगापूर-खुलताबाद मतदार संघातून राष्ट्रवादीकडून माने यांनी उमेदवारी जाहीर होऊ शकते.