महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाचा वाद
महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. गटनेते रोहिणी संजय शेंडगे यांची नियुक्ती करण्याच्या मागणीचे स्मरणपत्र शिवसेनेच्या नगरसेवकांनी एकत्रित रीत्या महापौर बाबासाहेब वाकळे यांना आज दिले. या पदावर पक्षाचे गटनेते संपत बारस्कर यांची नियुक्ती करावी, अशा मागणीचे पत्र राष्ट्रवादीने पूर्वीच दिले आहे. मात्र शिवसेनेचे स्मरणपत्र प्राप्त होताच महापौर वाकळे यांनी तातडीने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसमवेत बंद दालनात चर्चा केली. विरोधी पक्षनेते पद न मिळाल्यास सेनेच्या नगरसेवकांनी त्याला न्यायालयात आव्हान देण्याचीही तयारी सुरू केली आहे.
महापालिकेचे नवीन सभागृह अस्तित्वात आल्याला आता पुढील महिन्यात एक वर्ष पूर्ण होईल. मात्र महापौर वाकळे यांनी अद्यापि स्वीकृत नगरसेवक व विरोधी पक्षनेता निवडीचा निर्णय घेणे टाळले आहे. महापालिकेत राज्यात अस्वस्थता निर्माण करणारी भाजप व राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. दोन्ही पक्षांनी शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले आहे. त्याचे पडसाद वेळोवेळी उमटले. या सर्वाचे पडसाद त्यानंतर लगेच होणाऱ्या लोकसभा व नंतरच्या विधानसभा निवडणुकीदम्यान, शहरातील युतीमध्ये उमटतील हे लक्षात घेऊन स्वीकृत व विरोधी पक्षनेते पदाची निवड वाकळे यांनी लांबणीवर टाकली. मात्र त्यापूर्वीच भाजपने सभागृहनेते आपल्या पद पदरात पाडून घेतले.
महापालिका निवडणुकीत भाजप व शिवसेना स्वतंत्र लढले, महापौर पदाच्या निवडीत भाजप व राष्ट्रवादी एकत्र आले. त्यानंतर लगेच शिवसेनेने गेल्या फेब्रुवारीतच विरोधी पक्षनेते पदावर गटनेते रोहिणी शेंडगे यांची नियुक्ती करण्याचे पत्र दिले होते, त्यापाठोपाठ राष्ट्रवादानेही संपत बारस्कर यांच्यासाठी मागणीचे पत्र दिले. महापौर निवडीनंतर शहरातील युतीमध्ये निर्माण झालेला तणाव महापालिकेत अद्यापि कायम आहे. त्यातूनच महापौर वाकळे यांनी स्वीकृत व विरोधी पक्षनेते पदाची नियुक्ती लांबणीवर टाकलेली आहे. स्वीकृत पदाबाबत शिवसेना किंवा राष्ट्रवादी यांच्यात फारसा वाद नसला, तरी भाजपमध्ये मात्र प्रचंड रस्सीखेच आहे. महिला व बाल कल्याण समितीचे उपसभापती पद सेनेच्या सुवर्णा गेनप्पा यांनी स्वीकारल्याने सेना सत्तेत सहभागी असल्याचा अर्थ भाजपकडून लावला जात आहे. हा मुद्दा सेनेला विरोधी पक्षनेते पदाच्या मागणीसाठी अडचणीचा ठरत आहे.
दरम्यान काल, सोमवारी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी शहरातील प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेताच आज शिवसेनेचे संभाजी कदम, दत्तात्रय कावरे, संजय शेंडगे, प्रशांत गायकवाड, अमोल येवले, अनिल शिंदे, गेनप्पा आदींनी शहरातील स्वच्छता, खड्डे व इतर प्रश्नांवर उपायुक्त सुनील पवार व प्रदीप पठारे यांची भेट घेत निवेदन दिले व प्रश्न पंधरा दिवसांत न सोडवल्यास आंदोलनाचा इशारा दिला.
महिनाभरात निवड करू – महापौर
विरोधी पक्षनेते पदावरील नियुक्तीसाठी शिवसेनेकडून स्मरणपत्र प्राप्त झाल्याचे महापौर वाकळे यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी या पदासाठी राष्ट्रवादीचेही पत्र असल्याकडे लक्ष वेधले. विरोधी पक्षनेते पदाची निवड येत्या महिनाभरात केली जाईल, असे महापौर वाकळे यांनी सांगतानाच त्यापूर्वी स्वीकृत नगरसेवकांची निवड केली जाईल, असेही स्पष्ट केले. या दोन्ही निवडी लांबणीवर पडल्याचे त्यांनी मान्य केले. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची आज, मंगळवारी बंद दालनात केवळ विकास कामावर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.