केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते नारायण राणे यांनी अलीकडेच शिवसेनेबाबत मोठं विधान केलं होतं. २०२४ मध्ये मुंबईत शिवसेनेचा एकही खासदार निवडून येणार नाही, अशा आशयाचं विधान नारायण राणे यांनी केलं होतं. राणेंच्या या विधानाचा ठाकरे गटाचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. नारायण राणेंचा आम्ही दोनदा ‘खुळखुळा’ केला. त्यांनी स्वत:चा विचार करावा, असं सावंत म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नारायण राणेंच्या संबंधित विधानाबाबत विचारलं असता अरविंद सावंत म्हणाले, “मला असं वाटतं की, त्यांच्यावर काहीही भाष्य करू नये. पण अगदीच दुर्लक्ष केलंय, असं वाटू नये म्हणून एवढंच सांगतो की, त्यांनी स्वत:चा विचार करावा. आम्ही त्यांचा दोनदा ‘खुळखुळा’ करून ठेवला आहे. त्यांचे चिरंजीव आणि ते स्वत: पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांना असं बोलण्याचा काय नैतिक अधिकार आहे?” असा सवाल अरविंद सावंतांनी विचारला आहे.

हेही वाचा- Andheri Bypoll: “आम्ही काय निर्णय घ्यावा, हे…”, निवडणूक लढवू नका सांगणाऱ्या राज ठाकरेंच्या पत्रावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अरविंद सावंत पुढे म्हणाले, “ज्या लोकांना स्वत:चं बूड नाही. अशा लोकांची दखल कशासाठी घ्यायची. त्यांनी ५० पक्ष बदलले आहे. आधी शिवसेनेत होते, मग स्वाभिमानी पक्ष काढला. पुढे स्वाभिमान गहाण ठेऊन काँग्रेसमध्ये गेले. मग स्वाभिमानी पक्ष बंद करून भाजपात प्रवेश केला. हा प्रवास करणाऱ्या माणसाची नीतिमूल्ये काय आहेत? आणि त्यांचं नैतिक अधिष्ठान काय आहे? त्यामुळे नीतिमूल्ये आणि नैतिक अधिष्ठान नसलेल्या लोकांच्या कुठल्याही भाष्याची माध्यमांनीदेखील दखल घेऊ नये, अशी माझी तुम्हाला विनंती आहे” अशी प्रतिक्रिया सावंतांनी दिली आहे.