scorecardresearch

नारायण राणेंना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर शिवेसनेकडून पहिली प्रतिक्रिया; संजय राऊत म्हणाले…

“नारायण राणेंची उंची दिलेल्या जबाबदारीपेक्षा मोठी”

Shivsena, Sanjay Raut, BJP, Narayan Rane, Narendra Modi Cabinet Reshuffle
"नारायण राणेंची उंची दिलेल्या जबाबदारीपेक्षा मोठी"
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला असून नारायण राणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणेंकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या शपथविधीत सर्वात प्रथम नारायण राणे यांनी शपथ घेतली. दरम्यान नारायण राणे यांना केंद्रात स्थान दिल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे. शिवसेनेनेही यावर प्रतिक्रिया दिली असून राणेंची उंची दिलेल्या जबाबदारीपेक्षा मोठी असल्याचं म्हटलं आहे.

VIDEO: नारायण राणेंना मंत्रिपद दिलं तर भाजपाला काय फायदा?; जाणून घेऊयात पाच कारणे

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “नारायण राणे यांना मंत्री केलं आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय दिलं आहे. नारायण राणे यांची उंची त्यापेक्षा मोठी आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री होते, अनेक पदं त्यांनी सांभाळली आहेत,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसंच नारायण राणेंसमोर महाराष्ट्र आणि देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याचं तसंच करोना काळात कोलमडलेल्या उद्योगांना संजीवनी देण्याचं आव्हान असल्याचंही ते म्हणाले आहेत.

कोकणात शिवसेनेला फटका बसेल का?

“शिवसेनेला फटका बसण्यासाठी त्यांना मंत्रीपद दिलं असेल तर तो मोदींच्या कॅबिनेटचा अपमान आहे. त्यांना देशाचं काम करण्यासाठी मंत्रीपद दिलं जातं. शिवसेना, राष्ट्रवादीला फटका देण्यासाठी किंवा जे राजकीय विरोधक आहे त्यांना फटका देण्यासाठी मंत्रीपद दिले जात असतील तर हे घटनाविरोधी आहे. असं असेल तर त्यांना कळवायला सांगा की, त्यांना देशाची सेवा करण्याऐवजी या कामासाठी मंत्रीपद दिलं आहे. पण असं वाटत असेल ते चुकीचं आहे. मंत्रीपद राज्याचं आणि देशाचं असतं जे विकास आणि लोकांची कामं कऱण्यासाठी असतात,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

प्रकाश जावडेकरांसारखा मोहरा पडला

“मोदींनी मंत्रिमंडळाचे पत्ते पिसले असून महाराष्ट्राच्या वाट्याला काही मंत्रीपदं आली आहेत. पण प्रकाश जावडेकरांसारखा अनुभवी आणि ज्येष्ठ मोहरा पडलेला आहे,” असंही यावेळी ते म्हणाले.

मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा शिवेसना राष्ट्रवादीचाच

“भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आभार मानले पाहिजेत. आमच्याकडून जो पुरवठा झाला आहे त्यामुळेच महाराष्ट्रातून मंत्रीमंडळात चेहरे मिळाले आहेत. कपिल पाटील हे राष्ट्रवादीचं प्रॉडक्ट आहे. भारती पवार या पूर्णपणे राष्ट्रवादीचं प्रोडक्शन आहे. नारायण राणे हे शिवसेना, काँग्रेस करत भाजपात गेले आहेत. मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा शिवेसना राष्ट्रवादीचाच आहे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
“केंद्रात पाहिलं तर अनेक जुने जाणते बाजूला आहेत आणि बाहेरुन आलेल्या अनेकांना जबाबदाऱ्या दिल्या आहेत. सक्षमता पाहून दिलं असावा असं मी मानतो,” असंही यावेळी ते म्हणाले.

मंत्र्यांकडून काय अपेक्षा

“त्यांनी देशाचा कारभार सांभाळायचा आहे. आर्थिक, महागाई, आरोग्यविषय आणीबाणी, बेरोजगारी या सगळ्या संदर्भात महाराष्ट्रातल्या मंत्र्यांवर जबाबदारी आली आहे. नवीम मंत्र्यांना शुभेच्छा आहेत. महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदाना द्यावं,” अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena mp sanjay raut bjp narayan rane narendra modi cabinet reshuffle sgy

ताज्या बातम्या