मागील काही दिवसांपासून शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे बंडखोर आमदारांच्या निशाण्यावर आले आहेत. अनेक बंडखोर आमदारांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. एरवी पत्रकार परिषदेत प्रत्येक प्रश्नाला सडेतोड उत्तर देणारे राऊत आता शांत झाल्याचं दिसत आहे. नुकतीच झालेली एक पत्रकार परिषद त्यांनी अवघ्या दीड मिनिटांत संपवली आहे. यावेळी विचारलेल्या एकाही प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नवीन सरकार आणि मंत्रिमंडळाचा विस्ताराबाबत विचारलेल्या एकाही प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं त्यांनी टाळलं आहे. राज्याबाबत काही प्रश्न असतील तर तेच प्रश्न विचारा, असं म्हणत ते पत्रकारांवरच संतापले. त्यानंतर ते पत्रकार परिषदेतून उठून गेले.

खरंतर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी करणाऱ्या आमदारांवर जोरदार टीका केली होती. यावेळी त्यांनी विविध प्रकारचे आरोप देखील केले होते. “गद्दारांनो तुम्ही विकले गेले आहात, गळ्यात पाटी घालून कामठीपुऱ्यात उभं राहा” अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली होती. या टीकेमुळे बंडखोर आमदारांचा संजय राऊतांवर प्रचंड रोष आहे.

हेही वाचा- “मी सांगोल्याचा माजलेला रेडा…” जाहीर सभेतून शहाजीबापू पाटलांकडून संजय राऊतांना थेट धमकीवजा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर बंडखोर आमदारांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेना फुटली, असा आरोप देखील बंडखोर आमदारांनी केला आहे. सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी देखील काल सांगोल्यातील जाहीर सभेतून संजय राऊत यांना “आमच्या नादी लागू नका” असं म्हणत धमकीवनजा इशारा दिला होता. तर बंडखोर महिला आमदारांना वेश्या म्हणणाऱ्यांना लोक जोड्याने मारतील असं विधान बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी केलं होतं.