मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शंभर कोटींच्या खंडणीप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केल्याच्या प्रकरणावरुन बोलताना राऊत यांनी या प्रकरणामध्ये तक्रारदार असणाऱ्या सिंह यांनी देश सोडून फरार होण्याबद्दलच्या घटनेसंदर्भात एक महत्वाचा दावा केलाय. परमबीर सिंह हे देशाबाहेर पळून गेल्याचा संदर्भ देताना ते अनेक देशांमध्ये फिरत असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. यामागील कारणही त्यांनी सांगितलं आहे.
ही अटक म्हणजे क्रौर्य…
आधी छगन भुजबळ आणि आता अनिल देशमुख यांना अटक केली आहे याबद्दल काय सांगाल, असा प्रश्न टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला असता दिवाळीच्या तोंडावर झालेली ही कारवाई म्हणजे क्रौर्य आहे असं राऊत म्हणालेत. “महाराष्ट्रात दिवाळी हा पवित्र आणि महत्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यांना दिवाळीत अटक करण्यात आलीय. तुम्ही यातून काय दाखवताय?,” असा प्रश्न राऊत यांनी विचारला आहे. “त्यांना चौकशीला पुन्हा बोलवता आलं असतं. अनेकांना बोलवतात. हे क्रौर्य आहे अमानुषता आहे. जी भारतीय जनता पक्षाच्या प्रेरणेतून केंद्रीय तपास करतायत त्यातून हे निर्माण झालंय,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.
अधिकारी पळून गेलाय…
पुढे बोलताना, “त्यांच्यावर एका पळून गेलेल्या अधिकाऱ्याने आरोप केलाय. तक्रारदार हजर पाहिजे ना. फिर्यादी कुठे आहे. फिर्यादी देशाबाहेर पळून गेला असं म्हणतायत. फिर्यादी पण साधा नाही डीजी लेव्हलचा अधिकारी आहे. तो कुठे जातो, कुठे गायब होतो देशालाही माहिती नाही. सक्षम केंद्रीय गृहमंत्रालयाला, आयबी, रॉला माहितं हवं ना कुठंय तो? का तुम्हीच त्याला लपवून लावलाय, पळवलाय. की (सांगितलं) महाराष्ट्राच्या अमुक अमुक मंत्र्यांवर आरोप कर आणि पळून जात,” असं राऊत म्हणालेत. जोपर्यंत तक्रारदार हजर होत नाही तोपर्यंत देशमुखांची अटक ही बेदकायदेशी आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे. 
परमबीर सिंह बऱ्याच देशांमध्ये फिरतायत…
परमबीर सिंह हे अनेक देशांमध्ये फिरत असल्याचा दावा राऊत यांनी केलाय. “तक्रारदाराचं स्टेटमेंट रेकॉर्ड करायला हवं होतं. तक्रादाराचं स्टेमंट नोंदवून घ्यायला हवं होतं. मला जर हा देश सोडायचा असेल तर सोप्प नाहीय. नेपाळला जायचं असेल तरी आडवतात,” असं परमबीर सिंग परदेशात गेल्यासंदर्भात बोलताना राऊत यांनी म्हटलं आहे. 
परमबीर सिंग हे बेल्जियममध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. यांच्याबद्दल तुमच्याकडे किंवा शिवसेनेकडे काही माहिती आहे का असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. याबद्दल बोलताना, “ते बऱ्याच देशांमध्ये फिरतायत, कारण ते फार काळ एका देशात राहू शकत नाही. त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस बजावली आहे, सध्या तरी मी एवढं सांगू शकतो,” असं राऊत म्हणाले.
 
  
  
  
  
  
 