शिवसेना आमदार संजय राठोड यांनी शिवसेनेशी गद्दारी केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी राठोडांविरोधात दंड थोपटले आहेत. शिवसेनेचे यवतमाळ जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी संजय राठोड यांचे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील पुरावे समोर आणणार असल्याचं म्हटलंय. तसेच या प्रकरणातील ५६ मिनिटांची एक सीडी माझ्याकडे असल्याचा दावा राजेंद्र गायकवाड यांनी केला आहे. या सीडीतून बंजारा समाजाची मुलीला संजय राठोड यांनी कसं मारलं हे उघड होईल, असाही दावा गायकवाड यांनी केलाय.

राजेंद्र गायकवाड म्हणाले, “पूजा चव्हाण या बंजारा समाजाच्या तरुणीला मारून संजय राठोड यांनी बंजारा समाजाशी बेईमानी केली. संजय राठोड यांनी पूजा चव्हाणवर कसे अत्याचार केले हे आम्हाला माहिती आहे. आम्ही त्याचा पर्दाफाश करू.”

हेही वाचा : Photos : हेच ते ४० बंडखोर आमदार, कुणाची संपत्ती किती, कोणते गुन्हे दाखल? वाचा सविस्तर…

“राठोड विरुद्ध गळा काढणाऱ्या चित्रा वाघ व इतर भाजपा नेते आता त्यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसणार असा सवालही गायकवाड यांनी केला. संजय राठोड यांनी गुवाहाटीतून मातोश्रीवर यावे आणि माफी मागावी अन्यथा त्यांना जिल्ह्यात फिरु देणार नाही, असा इशाराही यावेळी शिवसैनिकांनी दिला.