शिवसेनेतलं आत्तापर्यंतचं सर्वात मोठं बंड ठरलेल्या शिंदे गटाच्या उठावानंतर राज्यातली राजकीय समीकरणं बदलली आहेत. शिंदे गटानं भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यात सरकार स्थापन केलं असून महाविकास आघाडीला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं आहे. या पार्श्वभूमीवर नेमकं हे सगळं कसं जुळून आलं? भाजपानं या सगळ्यामध्ये नेमकी कोणती भूमिका बजावली? या सगळ्या गोष्टींवर जोरदार चर्चा आणि तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. आपण सूरतला कसे गेलो, यासंदर्भात आता बंडखोर आमदार आशिष जैस्वाल यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. वर्षावरून बाहेर आल्यावर आपण थेट देवेंद्र फडणवीसांना फोन केल्याचं जैस्वाल यांनी सांगितलं आहे. टीव्ही ९ शी बोलताना जैस्वाल यांनी या सगळ्या घटनाक्रमावेळी पडद्यामागे घडलेल्या घडामोडी सांगितल्या आहेत.

“मी ७ जूनलाच सांगितलं होतं…”

आमदारांची खदखद विचारात घेतली नाही, तर महागात पडेल असा इशारा आपण ७ जूनलाच दिला होता, असं जैस्वाल म्हणाले आहेत. “हे बंड नव्हे, उद्रेक होता. मी ७ जूनला म्हणालो होतो की महाराष्ट्रात मंत्र्यांना अनेक कामांसाठी पैशांची अपेक्षा असते. आमदारांची खदखद दूर करा, अन्यथा महाविकास आघाडी सरकारला महागात पडेल हा इशारा मी दिला होता. त्यानंतर राज्यसभा आणि विधानपरिषदेची निवडणूक झाली. परिषदेच्या निवडणुकीनंतर हा उद्रेक झाला”, असं जैस्वाल म्हणाले.

“…म्हणून अडीच वर्ष शांत होतो”

शिवसेनेचा मुख्यमंत्री होता म्हणून अडीच वर्ष आम्ही शांत होतो, असं जैस्वाल म्हणाले आहेत. “जनादेश झुगारून अभद्र युती स्थापन करण्यात आली होती. तो जनादेशाचा अपमान होता. मुख्यमंत्रीपदासाठी वाद झाला. शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद हवं होतं. त्यामुळे अडीच वर्ष शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना आम्ही शांत होतो. कुचंबणा, त्रास, निधी वाटपातील असमतोलाबाबत वारंवार तक्रारी केल्या. उद्धव ठाकरेंनी कोमातल्या पक्षांना संजीवनी देऊन जिवंत, असंही मी म्हणालो होतो. पण अडीच वर्षांनंतर आमदारांना नाईलाजाने उठाव करावा लागला”, असं जैस्वाल म्हणाले.

“उद्धव ठाकरेंनी असं वक्तव्य केलं, याचा अर्थ त्यांनाही खात्री पटलीये की..”, बंडखोर आमदार शंभूराजे देसाईंचं वक्तव्य!

नेमकं हे सगळं घडलं कसं?

दरम्यान, हे सगळं बंड कसं घडून आलं, याविषयी आशिष जैस्वाल यांनी खुलासा केला आहे. “दर बुधवारी आम्ही मुंबईला जात होतो. तेव्हा काही आमदारांशी संपर्क व्हायचा. एक दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला असं बोलणं होत गेलं. तेव्हा लक्षात आलं की ९० टक्के आमदार संतप्त आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आमदारांच्या राजकीय भवितव्यावर टांगती तलवार होती. शिवसेना जर कमकुवत होत असेल, तर तिच्या भवितव्यासाठी ठोस निर्णय घेऊन जनतेनं दिलेल्या निर्णयाचा सन्मान करणं ही आमची जबाबदारी होती”, असं जैस्वाल म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्या दिवशी वर्षातून भावनिक होऊन निघालो”

स्वत: आशिष जैस्वाल सूरतला कसे पोहोचले, याविषयी त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘वर्षा’ निवासस्थानातून दु:खी होऊन बाहेर पडलो आणि फडणवीसांना फोन केला, असं ते म्हणाले. “मी वर्षातून निघालो, तेव्हा खूप भावनिक होतो. बाहेर निघालो तेव्हा मी देवेंद्र फडणवीसांना फोन केला. त्यांना म्हटलं, साहेब मी निघालो आहे. मलाही तिकडे जायचंय. मी त्यांना विनंती केली की वर्षावरची जी परिस्थिती पाहिली, त्यामुळे मला वेदना झाल्या. मला खूप दु:ख होतंय. आम्हाला दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यांनीही माझ्या भावनेला दुजोरा दिला. तेही मला म्हणाले की आशिष, मी तुझी भावना समजू शकतो. यापुढे आपल्याला याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नाही”, असं ते म्हणाले.