मोदींचे सरकार स्वातंत्र्यानंतरच्या चुका सुधारत आहे. कोणत्या चुका? असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. स्वातंत्र्याच्या नंतर देशात ‘सुई’ बनत नव्हती. त्यानंतर वेगाने प्रगती झाली. देशाने कृषी व उद्योग क्षेत्रात प्रगती केली. नेहरू-इंदिरा काळात डॉलरच्या तुलनेत रुपया स्थिर होता. आज रुपया धारातीर्थी पडला आहे. सर्वकाही कोसळताना, नष्ट होताना दिसत आहे. तेव्हा नवा इतिहास कसा घडविणार? अशी विचारणा शिवसेनेने सामना संपादकीयमधून केली आहे. जुने नष्ट करणे म्हणजे नवे काही घडवणे नव्हे असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

अग्रलेखात काय ?

“स्वातंत्र्यानंतरच्या चुका आम्ही सुधारत आहोत, असे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले आहे. चुका सुधारणार म्हणजे ते नक्की काय करणार? हे आता स्पष्ट झाले आहे. गेली सातेक वर्षे मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार सत्तेवर आहे. या सात वर्षांत नवे व उत्साहवर्धक असे काहीच घडवता आलेले नाही. त्यामुळे उदात्त, उत्तम असे जुने जे काही आहे ते नष्ट करायचे, असा राष्ट्रीय उपक्रम सध्या चालू आहे. जुने आहे ते विकायचे किंवा तोडायचे असे जे चालले आहे, त्यालाच चुका सुधारणे असे म्हणायचे आहे काय?,” अशी उपहासात्मक विचारणा शिवसेनेने केली आहे.

First Secretary Anupama Singh
“जम्मू-काश्मीरच्या प्रकरणात…”, भारताच्या प्रतिनिधी अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल
rahul gandhi wayanad election
सीपीआयने उमेदवार दिल्यानंतरही काँग्रेसला वायनाडमधून राहुल गांधीच का हवेत?
Shahjahan Sheikh arrest
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेखला ५४ दिवसांनी अटक
narendra modi and sharad pawar
काँग्रेसच्या काळात एका रुपयाचे  १५ पैसे व्हायचे, आता मी एक बटण दाबले आणि…; पंतप्रधान माेदींकडून शरद पवार यांचे नाव न घेता टीका

“स्वातंत्र्यानंतरच्या चुकांवर जे बोलत आहेत त्यापैकी कोणीच स्वातंत्र्य लढय़ात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागी नव्हते. जनसंघ किंवा भारतीय जनता पक्षाचा तेव्हा जन्मही झाला नव्हता. जे स्वातंत्र्य लढय़ात सहभागी नव्हते ते आता स्वातंत्र्यानंतरच्या चुका शोधायला बसणार आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या चुका शोधणे याचा सरळ अर्थ असा की, गेल्या पन्नास-साठ वर्षांत राष्ट्र घडविण्याचे जे कार्य घडले ते सर्व नष्ट करणे. नव्या इतिहासाची पाने आजच्या लोकांना जशी हवीत तशी लिहून घेणे. बाकी दुसरे काही दिसत नाही,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.

“मोदी यांनी दिल्लीतील जुन्या भव्य इमारती पाडण्याचे काम सुरू केले आहे. संसद भवनाची ऐतिहासिक व रोमांचक वास्तूही त्यांच्या कचाटय़ातून सुटली नाही. सध्याच्या संसद भवनाचे महत्त्व स्वातंत्र्य लढय़ाशी संबंधित आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात सहभागी झालेल्या महान वीरांच्या पदस्पर्शाने ही इमारत पावन झाली. याच इमारतीत संविधान सभा भरली. येथेच तो नियतीशी करार झाला. मोदी प्रथम दिल्लीत पंतप्रधान म्हणून आले तेव्हा याच इमारतीच्या पायरीवर मस्तक टेकवून ते भावनाविवश झाले होते, पण ही इमारत म्हणजे चूक आहे व ती सुधारण्यासाठी मोदी हे नवी इमारत बांधत आहेत. मोदी यांनी आता इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य होलोग्राम पुतळा बसवला आहे. स्वातंत्र्यानंतर देशाची संस्कृती व संस्काराबरोबरच अनेक महान नेत्यांचे योगदान नाकारण्यात आले. त्यात नेताजी आहेत असे भाजपचे मत बनले आहे. त्यामुळे मोदी सरकार चुका सुधारत आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“पहिल्या पाच वर्षांत नेताजी त्यांच्या खिजगणतीत नव्हते”

“मोदी सरकारचे नेताजीप्रेम थक्क करणारे आहे. मोदी सरकारचे हे सातवे वर्ष आहे. पहिल्या पाच वर्षांत नेताजी त्यांच्या खिजगणतीत नव्हते. प. बंगालच्या विधानसभा निवडणुकीत नेताजींची प्रथम आठवण झाली व उद्याच्या लोकसभा निवडणुकीत प. बंगालातील जनतेने अगदीच धुळीस मिळवू नये यासाठी नेताजी बोस यांच्या नावाने नौका पार करण्याचा प्रयत्न दिसतोय,” अशी शंका शिवसेनेने उपस्थित केली आहे.

“नेताजी यांचे स्वातंत्र्य लढय़ातले योगदान मोठेच आहे. नेताजींनी आझाद हिंद सेनेची उभारणी करून ब्रिटिशांना सरळ आव्हान दिले. ब्रिटिशांकडे स्वातंत्र्याची भीक मागणार नाही, तर ते मी मिळवीन, असे नेताजींनी ठणकावून सांगितले होते, पण त्या काळात ब्रिटिशांकडे स्वातंत्र्याची भीक आणि याचना कोणीच केली नव्हती. तात्या टोपेंपासून क्रांतिवीर फडके, चापेकर बंधू, भगतसिंग, राजगुरू, अश्फाकउल्ला खानसारखे वीर स्वातंत्र्यासाठी फासावर गेले. वीर सावरकरही क्रांतिकार्यात मग्न होते. नेताजी यांनी परदेशात ब्रिटिशांविरुद्ध पहिले पर्यायी सरकार स्थापन केले हे खरेच; पण महाराष्ट्रातही वारणेच्या खोऱ्यात क्रांतिवीर नाना पाटलांनी असे प्रतिसरकार स्थापन करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. उत्तर प्रदेशातील एका राजानेही परदेशात जाऊन ब्रिटिशांविरोधात पर्यायी सरकार उभारलेच होते. हे सर्व लोक अज्ञात राहिले व त्यांच्या नावाने एखादा दिवा-पणतीही पेटवता आली नाही, म्हणून महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, जयप्रकाश नारायण, झैलसिंग, राजेंद्र प्रसाद, गोविंद वल्लभ पंत यांचे स्वातंत्र्य लढय़ातील योगदान सत्ताधाऱ्यांना पुसता येणार नाही,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“ऐतिहासिक अमर जवान ज्योतीवर सूड का घ्यावा?”

“इंडिया गेटवरील अमर जवान ज्योत विझवून ही ज्योत आता राष्ट्रीय युद्ध स्मारकात पेटविण्याचे ठरले आहे. जुने विझवायचे व मोदी यांनीच उद्घाटन केलेली नवी ज्योत पेटवायची असे हे धोरण आहे. गेली 50 वर्षे शूर जवानांच्या शौर्याचे प्रतीक असलेली अमर जवान ज्योत पेटत ठेवली ही चूक होती काय? कोणाच्या मनात आले म्हणून ती चूक ठरत नाही. राष्ट्रीय युद्ध स्मारक हा स्वतंत्र विषय आहे. त्याचेही स्वागतच व्हावे, पण त्यासाठी ऐतिहासिक अमर जवान ज्योतीवर सूड का घ्यावा?,” असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.

“1972 मध्ये पाकिस्तानसोबतच्या युद्धात हौतात्म्य पत्करलेल्या हिंदुस्थानी जवानांच्या स्मरणाची अमर जवान ज्योत प्रज्वलित करण्यात आली. या युद्धात हिंदुस्थानने पाकिस्तानचे दोन तुकडेच केले. हा इंदिरा गांधींनी ‘फाळणी’चा घेतलेला सूडच होता. असा दिग्विजय कधीच कोणाला नंतर मिळवता आला नाही. हा इतिहास सध्याच्या सरकारला मान्य नसेल तर त्यांनी त्यापेक्षा मोठा विजय प्राप्त करून इतिहास घडवायला हवा. सध्याच्या सरकारने पाकव्याप्त कश्मीरवर विजय मिळवावा. त्यांना कोणी अडवले आहे? लडाखमध्ये चीन घुसला आहे. त्याचा पराभव करावा व स्वतःची चूक सुधारावी, पण मोदी सरकार दुसऱ्यांच्या चुका दुरुस्त करत बसले आहे,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.

“मोदींचे सरकार स्वातंत्र्यानंतरच्या चुका सुधारत आहे. कोणत्या चुका? हा पुन्हा एकदा प्रश्न. स्वातंत्र्याच्या नंतर देशात ‘सुई’ बनत नव्हती. त्यानंतर वेगाने प्रगती झाली. देशाने कृषी व उद्योग क्षेत्रात प्रगती केली. पंडित नेहरूंनी एम्स, आयआयटी, अणुऊर्जा प्रकल्प, सार्वजनिक उपक्रमांची पायाभरणी केली. इंदिरा गांधींनी बँकांचे आणि विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले. लालबहाद्दूर शास्त्रींनी पाकिस्तानवर विजय मिळविला. राजीव गांधींनी देशात विज्ञान, तंत्रज्ञानाचा पाया रचला. कॉम्प्युटर आणले. डिजिटल इंडियाचा घोष केला. अटल बिहारी वाजपेयींनी दळणवळणात प्रगती केली. परराष्ट्रांशी संबंध सुधारले. मनमोहन सिंग यांनी देशात ऐतिहासिक अर्थक्रांती केली. नेहरू-इंदिरा काळात डॉलरच्या तुलनेत रुपया स्थिर होता. आज रुपया धारातीर्थी पडला आहे. सर्वकाही कोसळताना, नष्ट होताना दिसत आहे. तेव्हा नवा इतिहास कसा घडविणार? जुने नष्ट करणे म्हणजे नवे काही घडवणे नव्हे. स्वातंत्र्यानंतरच्या चुका सुधारण्याआधी स्वातंत्र्य लढय़ाचा इतिहास आणि नंतरची घोडदौड समजून घेतली पाहिजे,” असं शिवसेनेने सांगितलं आहे.