सीबीआय आणि ईडी पार्टीचे सदस्य आहेत का असा सवालही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला विचारला आहे. “सीबीआय, ईडीला आम्ही सांगू तसंच केलं जाईल असं त्यांना वाटत असेल. पण यामध्ये सर्वात जास्त अवमूल्यन सीबीआय आणि ईडीसारख्या संस्थांचं होत आहे हे स्पष्ट दिसत आहे,” असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सचिन वाझेंच्या पत्रातील आरोपांप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांचीदेखील सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली असून राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ठराव मंजूर करण्यात आला आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून आश्चर्य व्यक्त केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजपाचा रोख आता अजित पवारांच्या दिशेने! ‘या’ प्रकरणात केली CBI चौकशीची मागणी!

“अनिल परब असतील किंवा अजित पवार यांच्यासंदर्भात काही आरोप असतील तर महाराष्ट्रातील तपास यंत्रणा त्या आरोपांची चौकशी करण्यात सक्षम आहे, न्यायालयं आहेत. एखादा तपास सीआयएने वैगेरे करावा असे ठराव करा. किंवा मग आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याची भाषा करा. आता हेच बाकी आहे,” असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रात सरकार येईल वाटणारे अंधारात चाचपडत आहेत

“सरकारला दोन वर्ष होत आली असून यापुढील दोन वर्षही उद्धव ठाकरें यांचंच सरकार चांगल्या पद्धतीने चालणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे यंत्रणांचा वापर करून कोणाला महाराष्ट्रात आपलं सरकार येईल असं कोणाला वाटत असेल तर ते अंधारात चाचपडत आहेत,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

ई़डी आणि सीबीआयची बदनामी

“ईडी किंवा सीबीआयशी आमचं काही वैयक्तिक वैर नाही. त्या राष्ट्रीय संस्था आहेत. जर देशाचं नुकसान होणारी घटना असेल, मनी लाँड्रिंग असेल तर नक्कीच सीबीआय आणि ईडीने तपास केला पाहिजे. पण आज ज्या प्रकारची प्रकरणं त्यांच्याकडे दिली जात आहेत त्यावरून हे राजकीय वाटत आहे. ई़डी आणि सीबीआयची बदनामी केली जात आहे,” असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ईडी आणि सीबीआयने अयोध्येतील जमीन घोटाळ्याचा तपास करावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जमिनीचे व्यवहारच काढायचे असतील तर ईडी आणि सीबीआयसाठी अयोध्येतील महापौर उपाध्याय यांच्या नातेवाईकांनी रामजन्मभूमी न्यासासोबत केलेला जमिनीचा व्यवहार अत्यंत योग्य प्रकरण आहे. तिथेसुद्धा या केंद्रीय यंत्रणांनी तपास करणं गरजेचं आहे. आणि फक्त महाराष्ट्राच्याच कार्यकारिणीने कशाला तर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने अयोध्येत जो जमीन घोटाळा झाल्याचं स्पष्ट दिसत आहे त्याचा सीबीआय आणि ईडीकडून तपास करावा,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.