भारताच्या गानकोकीळा लता मंगेशकर यांचे छोटे भाऊ पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांना वीर सावकरांची देशभक्तीवर कविता रेडिओवर प्रस्तुत केली म्हणून ऑल इंडियो रेडिओच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आल होतं असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेतही काँग्रेसला पुन्हा एकदा लक्ष्य करताना हा मुद्दा उपस्थित केला होता. दरम्यान त्यांच्या या दाव्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोदींनी महाराष्ट्राला सुपर स्प्रेडर ठरवल्याने संजय राऊत संतापले, म्हणाले “आमच्या नद्यांमध्ये, समुद्रांमध्ये प्रेतं…”

“मी काल संसदेत मुद्दाम बोललो नाही. तिथे वीर सावरकरांचं गाणं गायल्याबद्दल ह्रदयनाथ मंगेशकरांना त्यांची नोकरी गमवावी लागली असं सांगण्यात आलं. मला कळायला लागल्यापासून मी ते ‘सागरा प्राण तळमळला’ गाणं आकाशवाणीवरुनच ऐकलं आहे. हे गाणं लोकप्रिय कऱण्याचं काम आकाशवाणीनेच केलं आहे. माणसाने किती खोटं बोलावं. घटनात्मक पदावरील व्यक्तीने तरी खोटं बोलू नये. पण मी त्यांना वंदन करतो,” असं संजय राऊत म्हणाले.

हृदयनाथ मंगेशकरांना नोकरीवरून काढलं होतं, मोदींनी काँग्रेसला करुन दिली आठवण; म्हणाले, “स्वातंत्र्याच्या या खोट्या…”

“माझ्या माहितीनुसार असं कुठेही रेकॉर्डमध्ये नाही. मी ऑल इंडिया रेडीओचे प्रमुख महेश केळुसकर यांचं निवेदन ऐकलं. त्यांनाही आश्चर्य वाटलं आहे. जर एखादं गाणं निर्माण केल्याबद्दल, गायल्याबद्दल एखाद्या संगीतकाराला काढलं असेल तर ते गाणं आकाशवाणीवर लावतील का? आजही मी आकाशवाणी, दूरदर्शन, टीव्हीवर ऐकतो. हे गाणं आमच्या ह्रदयात आहे. मंगेशकर भगिनी तसंच ह्रदयनाथ मंगेशकरांनी हे गाणं फार वरती नेऊन ठेवलं आहे. आमची सावकरांची भक्ती आहे. आमची नौटकं नाही,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

गोव्याच्या निवडणुकीमुळे हा उल्लेख झाला असावा का असं विचारण्यात आलं असता राऊत म्हणाले, “ते महान पंतप्रधान आहेत. त्यांच्या आधी कोणी झालं नाही आणि नंतर होणार नाही असं दिसत आहे. मी त्यांचा आदर करतो. ते मोठे नेते आहेत. मला त्यांच्याविषयी काही फार बोलायचं नाही”.

नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले होते?

“लता मंगेशकरांच्या निधनानं देश दुःखी झाला आहे. लता मंगेशकर यांचं कुटुंब हे गोव्यातील आहे. पण त्यांच्या कुटुंबासोबत कशाप्रकारे अन्याय केला हेदेखील देशाला समजलं पाहिजे. लता मंगेशकर यांचे छोटे भाऊ पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांना ऑल इंडियो रेडिओच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. हृदयनाथ मंगेशकर यांनी वीर सावकरांची देशभक्तीवर कविता रेडिओवर प्रस्तुत केली म्हणून त्यांना काढून टाकण्यात आलं होतं. हृदयनाथ मंगेशकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं,” असं नरेंद्र मोदी म्हणाले होते.

“जेव्हा ते सावरकरांना भेटले तेव्हा कवितेला चाल लावण्याबद्दल सांगितलं होतं. त्यावर सावरकरांनी हृदयनाथ यांना माझी कविता सादर करुन जेलमध्ये जायचंय का? अशी विचारणा केली होती. यानंतर हृदयनाथ यांनी त्यांच्या देशभक्तीपर कवितेला संगीतबद्ध केलं होतं. त्यानंतर आठ दिवसांच्या आत हृदयनाथ मंगेशकर यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं होतं. हे तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. स्वांतंत्र्याच्या या खोट्या गोष्टी तुम्ही देशासमोर ठेवल्या आहेत,” अशी टीका नरेंद्र मोदींनी यावेळी केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut on pm narendra modi lata mangeshkar hridaynath mangeshkar sgy
First published on: 10-02-2022 at 10:19 IST