हिवाळी अधिवेशनात सामना वृत्तपत्रावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे. देवेंद्र फडणवीस सामनाचा उल्लेख करत महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहेत. आजही देवेंद्र फडणवीस यांनी सामनामध्ये शरद पवारांवर याआधी करण्यात आलेल्या टीकेचा उल्लेख करत शिवसेनेवर टीका केली. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावत सामना वाचतील अधिक प्रगल्भ होतील असं म्हटलं आहे.

“सामना हा संताजी धनाजीप्रमाणे आहे, झोपेतसुद्धा दिसेल. मुख्यमंत्री असताना सामना वाचायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षातील सामना काढून ते वाचतील. ते अजून प्रगल्भ होतील. त्यांना विचार करण्याची सुबुद्धी निर्माण होईल,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस आज काय बोलले ?
महाविकास आघाडीमध्ये विसंवाद आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावेळी त्यांनी सामना वृत्तपत्रामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपांचं वाचनही केलं. यावेळी गुलाबराव पाटील यांनी हरकत घेतली. त्यावर बोलताना तुम्ही मंत्री बनणार आहात. जर तुम्ही माझ्या सामना वाचण्यावर हरकत घेतली तर संजय राऊत तुम्हाला मंत्री बनू देणार नाहीत, असा मिश्किल टोला लगावला.

मी सामना वाचत नव्हतो पण आता सबस्क्रिप्शन लावलं. पवारांबाबत काय काय बोललं गेलं, उद्धव ठाकरेंबाबत काय काय बोललं गेलं? हे महाराष्ट्राला ठाऊक आहे असं म्हणताच सभागृहात गदारोळ झाला. त्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चांगलेच टोले लगावले. उद्धव ठाकरेंनी निकालानंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, आमच्यापुढे सगळे पर्याय खुले आहेत. त्याचा सोयीस्कर विसर शिवसेनेला पडला आहे असं यावेळी त्यांनी सांगितलं.

सामना वाचत नाही म्हणणाऱ्यांनीच ‘सामना’ दाखवला-उद्धव ठाकरे
“सामना हे वृत्तपत्र कधीही वाचत नाही असं सांगणाऱ्यांनी आज सभागृहात सामना दाखवला. याचाच अर्थ सामना हे सामान्य माणसाचं शस्त्र आहे हे सिद्ध झालं आहे. सामना तेव्हाच वाचला असता तर आमच्याशी सामना करण्याची वेळ आली नसती,” अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर मंगळवारी केली.