राज्यसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर झाले असून सध्या राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. याआधी संभीजाराजे छत्रपती यांच्या उमेदवारीवरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. संभीजीराजेंनी निवडणुकीतून माघार घेताना शिवसेनेवर गंभीर आरोप केले. मात्र श्रीमंत शाहू महाराजांनी संभाजीराजेंवर टीका करत शिवसेनेची बाजू घेतल्याने नवा वाद सुरु झाला. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कोल्हापुरात शाहू महाराजांची भेट घेतली तर त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी फोनवरुन चर्चा केली.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंच्या समर्थकांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत छत्रपतींच्या घरात आग लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर संजय राऊत यांनी पुण्यात बोलताना उत्तर दिलं आहे.
नितेश राणे काय म्हणाले होते?
“हे काल ठाकरेंच्या घरात आग लावत होते, आज छत्रपतींच्या घरापर्यंत पोहचण्याची याची मजल गेलीये. म्हणून कधीतरी त्यांच्या आजूबाजूच्या बॉडीगार्डला १० मिनिटं सुट्टी दिली पाहिजे किंवा सुट्टीवर पाठवा. अशा लोकांना अंगरक्षकांची गरज नाही. थोडा मराठा समाजाने त्याचा ताबा घेतला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या घरी आग लावली त्यांनी आज छत्रपतींच्या घरी आग लावलेली आहे,” असं नितेश राणे म्हणाले होते.
“राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये संजय राऊतांनी आग लावली; आता त्यांची मजल छत्रपतींच्या घरापर्यंत गेलीय”
“हा जो आग लावण्याचा इतिहास आहे. ही आग लावण्याची हिंमत संजय राऊत करत आहेत याची किंमत कधी ना कधीतरी त्यांना मोजायला लागणार हे मी तुम्हाला नक्की सांगतो,” असंही नितेश राणेंनी म्हटलं होतं.
संजय राऊतांचं उत्तर –
“राजांना समर्थक नसतो, राजाला फक्त प्रजा असते. राजाला समर्थक आहेत हे मी पहिल्यांदाच ऐकत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थक नव्हते. सगळे मावळे, संपूर्ण राज्य त्यांचं होतं. ते एका जातीचे, पंथाचे राजे नव्हते. पंतप्रधानांचे समर्थक नसतात, देश त्यांचा आहे. मुख्यमंत्र्यांना समर्थक नसतात, राज्य त्यांचं आहे. तसंच राजांचं असतं,” असं संजय राऊत म्हणाले.
संभाजीराजेंच्या नाराजीबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “संभाजीराजे आणि आमचं बोलणं सुरु आहे. आमचे सर्वांचे ते मित्र आहेत. राजकारणात असे चढ उतार येत असतात. राजकारणात आहात तर असे धक्के पचवता आले पाहिजेत. ज्यांना पचवायची ताकद आहे त्यांनी राजकारणात यावं”.
देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात बुद्धीबळ स्पर्धेच्या उद्घाटनावेळी बुद्धिबळाप्रमाणेच राजकारणातही डोळ्यात तेल घालून दक्ष राहावे लागते. एकही चाल चुकली, तर पराभव ठरलेला असतो. आम्हीही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अशाच एका चुकीमुळे पराभूत झालो होतो असं म्हटलं. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, “बुद्धिबळाचे पट आमच्याकडेही आहेत. देशी खेळात शिवसेनेसारखा पटाईत पक्ष नाही. शरद पवार कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत. सगळे खेळ आमच्याकडे आहेत. फक्त संगीतखुर्ची नाही, खुर्ची आमच्याकडेच”.