पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा ज्वर एकीकडे वाढू लागलेला असताना महाराष्ट्रात मात्र शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षांमधला कलगीतुरा थांबण्याचं नाव घेत नाहीये. दोन्ही बाजूंनी सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांचे बंधू प्रविण राऊत यांच्यार ईडीनं कारवाई केल्यानंतर हा कलगीतुरा अजूनच वाढला आहे. सध्या गोवा दौऱ्यावर असलेल्या संजय राऊतांनी एबीपीशी बोलताना भाजपावर आणि ईडीच्या कारवाईवर तोंडसुख घेतलं. तसेच, भाजपानं आपला आत्मा तपासून पाहाण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं.
“उद्या ईडी आमच्या चरणाशी असेल, तेव्हा…”
“मी भाजपाच्या विरोधात लढतो आहे. त्यांचं सरकार मी महाराष्ट्रात येऊ दिलं नाही असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे जर भाजपाला मला तुरुंगात टाकायचं असेल, तर त्यांनी टाकावं. माझी तयारी आहे. मी भाजपाच्या दिल्लीतल्या लोकांना हे सांगितलं आहे. पण तुम्ही निरपराध लोकांना त्रास देऊ नका. आज ईडी तुमचं आहे, उद्या ईडी आमच्याही चरणाशी असेल, तेव्हा तुम्ही काय कराल?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
“भाजपानं स्वत:चा आत्मा तपासून पाहावा”
“भाजपानं स्वत:चा आत्मा तपासून घ्यायला पाहिजे. अटल बिहारी वाजपेयींनी स्थापन केलेला पक्ष हाच आहे का? देवेंद्र फडणवीस हे एक संस्कारी नेते होते. पण गेल्या काही दिवसांत त्यांचाही तोल गेलाय. चार-पाच पंटर घेऊन ते मुंबई-महाराष्ट्रात राजकारण करत आहेत. प्रत्येकाला राजकारणात या गोष्टींना सामोरं जावं लागतं. तुम्ही कितीही खोटं बोललात, तरी लोकं आम्हाला ओळखतात”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
“ज्यांच्या तोंडातून हे आरोप करत आहेत, ते उकीरड्यावरचे कुत्रे आहेत. त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाहीत. ते खोटे कागदपत्र बनवतात, खोटे आरोप करतात. करू द्या. माझा न्यायालयावर विश्वास आहे”, अशा शब्दांत संजय राऊतांनी भाजपावर आणि देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.
“कुछ मिला क्या?”; निकटवर्तीयांवरील ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांचा सवाल
“गोव्यात फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत”
दरम्यान, फडणवीस गोव्यात मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, पण त्यांच्यावर मोठी जबाबदारी असल्याचं राऊत यावेळी म्हणाले. “गोव्यात फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. राज्य लहान आहे. पण त्यांच्यावर जबाबदारी मोठी आहे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण त्यांच्यासाठी जमिनीवरचं वातावरण फार काही चांगलं नाहीये. मुख्यमंत्र्यांविरुद्ध फार असंतोष आहे. भाजपाला बहुमत नसेल. बहुमत नसतानाही सरकार बनवणं याला लोकशाहीत हत्या, भ्रष्टाचार, राजकीय व्याभिचार म्हणतात”, असं राऊत म्हणाले.