काही दिवसांपूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सामनामधील संपादकीयाविषयी आणि खासदार संजय राऊत यांच्याविषयी भूमिका मांडणारं एक खुलं पत्र सामनाला पाठवलं होतं. त्यावर संजय राऊत यांनी आजच्या रोखठोक सदरामधून चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक टीका देखील केली आहे. त्यापाठोपाठ आता पुण्याच्या भोसरीमध्ये बोलताना संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा खोचक टोला लगावतानाच इशारा देखील दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या या दोन्ही पक्षांमधल्या नेत्यांमधली जुगलबंदी चांगलीच रंगताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रकांत पाटील घासून निवडून आले

संजय राऊत भोसरीमध्ये शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा देखील उल्लेख केला. “कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील पुण्यातून निवडून येतात. भले घासून निवडून आले असतील. आपण यावेळी महापालिकेत घासून नसेना, पण ठासून येऊ”, असं राऊत म्हणाले.

अजितदादा आमच्या लोकांना नाराज करू नका, नाहीतर गडबड होईल”, शिवसेना खासदार संजय राऊतांचं विधान!

अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी चंद्रकांत पाटील यांना अप्रत्यक्ष इशारा देखील दिला. “कोल्हापूरचे गडी पिंपरी-चिंचवडला आले, तरी आमची हरकत नाही. त्याचं वाईट वाटत नाही. पण आमच्या अंगावर येऊ नका. कुणीही आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका”, असं राऊत यावेळी म्हणाले.

“एकमेव अजित पवार त्यांच्या खिशातून सटकले, तिथे १००…!” चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा टोला!

“अजित पवार सटकले…!”

आपल्या रोखठोक या सदरामधून संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी “देवेंद्र फडणवीस असे १०० अजित पवार खिशात घेऊन फिरतात”, असं विधान केलं होतं. त्यावरून संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “पाटील म्हणतात शंभर अजित पवार घेऊन देवेंद्र फडणवीस फिरात. हे विधान गंमतीचंच आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर पुढच्या ७२ तासांतच एकमेव अजित पवार त्यांच्या खिशातून सटकले. तिथे शंभर अजित पवार भाजपाला कसे झेपणार? पण श्री पाटील यांनी महाराष्ट्राचं मनोरंजन करायचं ठरवलंच असेल, तर त्यांना कोण थांबवणार?” असा खोचक सवाल देखील संजय राऊतांनी केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये आपल्या रोखठोक सदरात संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut warns bjp state president chandrakant patil pmw
First published on: 26-09-2021 at 16:26 IST