केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते शनिवारी (१३ जानेवारी) १९ व्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात बोलताना नारायण राणे यांनी अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यास नकार देणाऱ्या चारही शंकराचार्यांवर टीका केली. तसेच शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी आतापर्यंत काय योगदान दिलं आहे? असा प्रश्न उपस्थित केला. राणे म्हणाले, “इतक्या वर्षांनंतर राम मंदिर होत आहे, त्याचं कौतूक नाही. हा विषय आतापर्यंत कोणी घेतला नव्हता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि भाजपाने हा विषय हाती घेतला. शंकराचार्यांनी या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात की त्यावर टीका करावी?
नारायण राणे म्हणाले, शंकराचार्य हे आमच्या भाजपाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजकीय दृष्टीकोनातून पाहत आहेत. राम मंदिर राजकीय दृष्टीकोनातून होत नसून धार्मिक दृष्टिकोनातून होत आहे. राम हे आमचं दैवत आहे. त्यासाठी मंदिर उभारलं जातंय. शंकराचार्यांनी त्यांच्या जीवनातलं हिंदू धर्मासाठी दिलेलं योगदान त्यांनी सांगावं. ते योगदाना रामाने दिलं आहे.
राम मंदिराचे बांधकाम अपूर्ण असल्याने देशातील चार शंकराचार्यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. तर इतर दोन शंकराचार्यांनी अद्याप राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही.
हे ही वाचा >> “दोन वेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला घेऊन…”, नाना पटोलेंचा शिंदे गट अन् मिलिंद देवरांना टोला
राणे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान, भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाने नारायण राणेंच्या वक्तव्याला आमचा पाठिंबा नाही असं म्हटलं आहे. शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, श्री राम मंदिर समिती आणि शंकराचार्यांचा जो विषय आहे त्यात आम्हाला पडायचं नाही. तसेच नारायण राणे यांनी जे वक्तव्य केलं, त्यास आमची सहमती नाही, किंवा आमचा पाठिंबा नाही. काँग्रेस नारायण राणेंविरोधात आंदोलन करत असेल तर त्यांनी ते आंदोलन करावं. कदाचित त्यानिमित्ताने त्यांना रामाचं नाव घेण्याची इच्छा होईल.