Shivsena Shinde Faction Trolls Uddhav Thackeray : लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीमधील सर्वपक्षीय नेत्यांना गुरुवारी (७ ऑगस्ट) रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. दिल्लीतील त्यांच्या घरी ही बैठक पार पडली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारशी चालू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी या बैठकीसाठी इंडिया आघाडीतील मित्रपक्षांना व त्यांच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित केलं होतं. मात्र, या बैठकीवेळी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आमदार आदित्य ठाकरे शेवटच्या रांगेत बसले होते असा दावा करत शिवसेनेच्या (शिंदे) व भाजपाच्या नेत्यांनी काही फोटो व्हायरल केले आहेत.
शिवसेना (शिंदे) व भाजपा नेत्यांनी शेअर केलेल्या फोटोत दिसतंय की राहुल गांधी बैठकीला संबोधित करत आहेत. त्यांच्या मागे एक स्क्रीन देखील आहे. तर बैठकीला उपस्थित लोकांमध्ये उद्धव व आदित्य ठाकरे मागील रांगेत बसले आहेत.
शिवसेनेचा (शिंदे) चिमटा
यावरून शिवसेनेचे (शिंदे) खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. म्हस्के यांनी एक्सवर सदर फोटो शेअर करत म्हटलं आहे की “काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे… शिवरायांचा वारसा सांगता ना रे… काँग्रेसच्या मीटिंगमध्ये जाऊन शेवटच्या रांगेत बसलात? बाळासाहेबांनी (शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे) आम्हाला आत्मसन्मान, स्वाभिमान शिकवला. अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला, तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का?”
खासदार म्हस्के म्हणाले, “काँग्रेसने तुमची काय ही अवस्था करून ठेवली आहे आदित्य ठाकरे? तुमच्यापेक्षा एकेक खासदारवाले पक्ष बरे. त्यांनासुद्धा पुढच्या रांगेत बसवलं होतं. महाराष्ट्राची दिल्लीत जाऊन तुम्ही पार लाज घालवलीत. थोडा जरी स्वाभिमान आत्मसन्मान शिल्लक असेल तर जरा तरी पेटून उठा.”
आम्ही स्वतःहून मागच्या रांगेत बसलो होतो : संजय राऊत
दरम्यान, शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा व शिवसेना (शिंदे) नेत्यांच्या टीकेबद्दल ते म्हणाले, “हा सगळा भंपकपणा आहे. आम्ही राहुल गांधी यांच्या घरी गेलो होतो. तिथे एका पडद्यावर राहुल गांधी आमच्यासमोर सादरीकरण करत होते. पुढच्या रांगेत बसून स्क्रीनवरील सादरीकरण पाहताना त्रास होतो म्हणून आम्ही स्वतःहून मागच्या रांगेत बसलो होतो.”