Sanjay Raut On Eknath Shinde Delhi Visit : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा सुरु आहे. खरं तर राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र, तरीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अचानक दिल्ली गाठल्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. मात्र, शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचं कारण काय? असे सवाल विरोधकांनी विचारले होते.
दरम्यान, शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत मोठे दावे केले आहेत.’मुख्यमंत्री पदासाठी पक्ष भाजपात विलीन करायला देखील एकनाथ शिंदे तयार आहेत, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुपौर्णिमेनिमित्ताने दिल्ली दौऱ्यावर जाणार होते. तसेच मी जे बोलत असतो ती माहिती अधिकृत असते. याआधी देखील मी शिंदेंच्या बाबतीत बोललो होतो. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीत गुरू म्हणून अमित शाह यांची पूजा केली आहे, त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं, चाफ्याची फुले वाहिली. त्यानंतर ते त्या ठिकाणी इतर नेत्यांना देखील भेटले. तसेच या दौऱ्यात शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांची तक्रार केली”, असा दावा संजय राऊत केला आहे.
‘शिंदेंनी फडणवीसांची दिल्लीत तक्रार केली’ : राऊत
“देवेंद्र फडणवीस हे कोंडी करत आहेत, ते आम्हाला काम करू देत नाहीत, आमच्या आमदारांच्या चौकशा लावल्या आहेत. ते आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारच्या तक्रारी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे केल्या आहेत”, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
“तसेच एकनाथ शिंदेंनी एक ऑफर दिली की महाराष्ट्रात मराठी माणसांची जी एकजूट होत आहे. ही एकजूट अधिक भक्कम होईल. त्याचा त्रास महायुतीला होईल. त्यामुळे काहीही करून तुम्हाला (अमित शाह) यामध्ये लक्ष घालावं लागेल. मराठी माणसांची एकजूट कशा प्रकारे तोडता येईल हे पाहावं लागेल. जर ही एकजूट तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार नुकसान होईल, यावर एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याशी चर्चा केली”, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
‘पक्षासह भाजपात विलीन व्हायला तयार…’
अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना विचारलं की तुमच्या मनात काय आहे? त्यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले की मला मुख्यमंत्री करणं हाच त्यावरचा उपाय आहे. मी जर पुन्हा मुख्यमंत्री झालो तर मी सध्या सुरु असलेल्या सर्व गोष्टी थांबवेन, असं शिंदेंनी शाह यांना सांगितलं. त्यावर अमित शाह यांनी शिंदेंना सांगितलं की, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपाचाच असेल. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी त्यांना सांगितलं की, मी माझ्या पक्षासह भाजपात विलीन व्हायला तयार आहे, पण मला मुख्यमंत्री करा, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे केली आहे”, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.