ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्या घणाघाती भाषण करत एकनाथ शिंदेंवर आणि त्यांच्या बरोबर गेलेल्या ४० आमदारांवर जोरदार टीका केली आहे. तसंच भाजपाची परंपरा काय? तेदेखील सांगितलं आणि मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभं करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचेही आभार मानले आहेत. तसंच आत्ताच्या सरकारचा उल्लेख डायरचं सरकार असा केला आहे.

भाजपाची परंपरा काय? उद्धव ठाकरे म्हणाले..

“आज जे जमले आहेत तिकडे ते आमच्यावर टीका करतील त्यांना मी किंमत देत नाही. जातीपातीच्या भिंती उभ्या करुन सगळ्यांना आपसांत लढवण्याचं काम जे भाजपा करतं आहे ते आपल्याला मोडून काढायचं आहे. ज्यांच्याशी आपण लढतो आहोत तो (भाजपा) कपटी आहे. भाजपा इतका विघ्नसंतोषी आहे की कुणाचंही लग्न असो हे जाणार पंगतीत बसणार, भरपूर जेवणार, आडवा हात मारणार. श्रीखंड पुरी, बासुंदी, ३५ पुरणपोळ्या खाणार, सगळ्या पुरणपोळ्या फस्त करुन ढेकर देणार. पण लग्नातून निघताना नवरा बायकोत भांडण लावून निघणार असली ही (भाजपा) अवलाद आहे.

हे पण वाचा- “जालन्यात मराठा समाजावर लाठीचार्जचा आदेश देणारा डायर कोण? अजूनही…”, उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल

स्वातंत्र्य लढ्याचा आणि भाजपाचा संबंध नाही

मी परत एकदा सांगतो भाजपा असो किंवा त्याकाळातला जनसंघ असेल यांचा कुठल्याही लढ्याशी संबंध नव्हता. स्वातंत्र्य लढ्यात ते नव्हते, मराठवाडा मुक्तीसंग्रामात त्यांचं नाव ऐकलं नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही ते नव्हते. पण केव्हा एकत्र आले? संयुक्त महाराष्ट्र समितीत आले. कशासाठी आले? आयतं अन्न शिजतंय चला हात मारु म्हणून आले. सगळ्यात शेवटी हे आले आणि सर्वात आधी बाहेर पडले. जागावाटपाचं भांडण त्यावेळी त्यांनी केलं. विघ्नसंतोषीपण म्हणतात तो यालाच.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असल्या विघ्नसंतोषी अवलादीपासून सावध राहा

त्यानंतर भाजपा जनता पक्षाबरोबर केली तिथे दुहेरी वाद निर्माण केला, तोडफोड केली. मग शिवसेनेबरोबर आले, कधी अकाली दलाबरोबर गेले, कधी नितीश कुमारांबरोबर कधी यांच्या बरोबर कधी त्यांच्या बरोबर गेले. गोव्यात मगो पक्षाबरोबर गेले. जिथे जाते तिथे ती सत्यानास करते त्यामुळे भाजपापासून सावध राहण्याची गरज आहे. आजही भगवा मानाने आणि डौलाने फडकतो आहे त्या भगव्यातही भाजपाने दुही माजवली. अहमद शाह अब्दाली आला होता त्यानेही हेच केलं होतं. दुहीची बीजं पेरायची भांडणं लावायची आणि त्या भांडणातले खरे प्रश्न बाजूला सारायचे. तुमच्या चुली पेटवण्यापेक्षा आम्ही तुमची घरं आम्ही पेटवतो आणि त्यावर आम्ही आमची पोळी भाजतो हे यांचं धोरण आहे. आता हे सगळं उघड उघड दिसतंच आहे. असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.