बाळासाहेब ठाकरे नावाचा अद्भूत माणूस जन्माला आला, त्या माणसाने शिवसेना नावाचं महाकाव्य निर्माण केलं. आत्ता इथे समोर बसली आहे ती हीच शिवसेना आहे. या शिवसेनेचा भगवा विधानसभेवर भगवा फडकणार आणि उद्धव ठाकरेंना आपल्याला पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करायचं आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आपल्याला मालेगावचा ढेकूण चिरडण्यासाठी तोफेची गरज नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांची मालेगावमध्ये सभा आहे. त्या सभेच्या आधी संजय राऊत यांनी भाषण केलं. आपल्या भाषणात त्यांनी दादा भुसेंचा उल्लेख ढेकूण असा केला आहे.
ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही
आज सकाळपासून बातम्या सुरू आहेत की मालेगावात तोफ धडाडणार. आज सांगू इच्छितो मालेगावचा ढेकूण मारायला तोफेची गरज नाही. मग आपण इथे का जमलो आहे? तर आपली शिवसेना तुटली-फुटली नाही तर एकसंध आहे. त्यासाठी मालेगावातून उद्धव ठाकरेंची सभा होते आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. चिते की चाल, बाज की नजर ,बाजीराव की तलवार और उद्धव ठाकरेकी प्रामाणिकतापर संदेह नहीं करते असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. या महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, कांद्याला भाव नाही. कांदा रस्त्यावर फेकला जातो आहे पण आपल्याला त्या सुहास कांदेला रस्त्यावर फेकायचं आहे. त्या गुलाबराव पाटीलला रस्त्यावर फेकायचं आहे. ज्यांनी गद्दारी केली त्यांना त्याच खोक्याखाली चिरडायचं आहे हे विसरू नका असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शिवसेना कुठेही तुटलेली नाही फुटलेली नाही
शिवसेना कुठेही तुटलेली नाही, फुटलेली नाही, झुकलेली नाही. निवडणूक आयोगाने आमचं नाव काढून घेतलं असेल, चिन्ह काढून घेतलं असेल पण बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना ही महाराष्ट्रात पाय रोवून उभी आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे हे आपल्याला विचार देणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला विचार देण्यासाठी उद्धव ठाकरे इथे आलेले आहेत. महाराष्ट्राला हे कळलं पाहिजे की शिवसेना एकसंध आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.