करोनामुळे दिवसेंदिवस परिस्थिती चिंताजनक होत असताना केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील राजकीय संघर्षाच्या ठिणग्या उडताना दिसत आहे. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढत असल्यानं आरोग्य सुविधा कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळे राज्याकडून सातत्याने केंद्राकडे मागणी केली जात असून, महाराष्ट्राशी केंद्र सरकारकडून दुजाभाव केल्याचा आरोपही होत आहे. याच मुद्द्यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आकडेवारी मांडत केंद्राला उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी करोना प्रभावित ११ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांचा शनिवारी आढावा घेतला. या बैठकीला महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी करोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या व्हेंटिलेटर्स वाटपाची माहिती दिली. यात उत्तर प्रदेश, गुजरातपेक्षा महाराष्ट्राला कमी व्हेंटिलेटर्स देण्यात आलेली असून, त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी बोट ठेवलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी या बैठकीची माहिती देणारी बातमी शेअर केली आहे. त्यातील आकडेवारीचा हवाला देत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रास ११२१ व्हेंटिलेटर्स, १७०० उत्तरप्रदेशला, १५०० झारखंडला, १६०० गुजरातला, १५२ मध्यप्रदेशला आणि २३० छत्तीसगढला -डॅा. हर्षवर्धन यांची माहिती. …..तरी महाराष्ट्र लढेल आणि जिंकेल ……जय महाराष्ट्र,” असं ट्वीट करत आव्हाड यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

बैठकीत हर्ष वर्धन काय म्हणाले?

करोना संकटाचा सामना करण्यासाठी आरोग्यविषयक पायाभूत सुविधांमध्ये त्या तुलनेत करण्यात आलेल्या वाढीविषयीही त्यांनी माहिती दिली. “कोविड रूग्णांवर त्यांच्या आरोग्याच्या गांभीर्यानुसार, उपचार करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या त्रिस्तरीय आरोग्य सुविधांअंतर्गत, २०८४ समर्पित कोविड रुग्णालये (यापैकी ८९ केंद्राकडे तर उर्वरित १९९५ राज्यांकडे आहेत) ४०४३ समर्पित कोविड आरोग्य केंद्रं आणि १२,६७३ कोविड शुश्रुषा केंद्रं आहेत. या सर्व केंद्रांमध्ये एकूण १८,५२,२६५ खाटा आहेत. त्यापैकी ४,६८,९७४ खाटा समर्पित कोविड रुग्णालयांमध्ये आहेत. यावेळी, राज्यांना नव्या जीवनरक्षक प्रणालींचा पुरवठा केला जाईल,” असं आश्वासन डॉ. हर्ष वर्धन यांनी दिले. ११२१ व्हेंटिलेटर्स महाराष्ट्राला, १७०० उत्तरप्रदेशाला, १५०० झारखंडला, १६०० गुजरातला, १५२ मध्यप्रदेशला आणि २३० छत्तीसगढ या राज्यांना दिले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shortage of remdesivir injection ventilator shortage in maharashtra jitendra awhad narendra modi harsh vardhan bmh
First published on: 18-04-2021 at 11:18 IST