राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी त्यांच्या गावी गेले होते. गावी जाऊन त्यांनी शेती केली होती. शेती करतानाचे त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावरून तुफान व्हायरल झाले होते. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. शेतकऱ्याचा मुलगा हेलिकॉप्टरने फिरतो म्हणून विरोधकांनी टोला लगावला होता. विरोधकांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिप्रश्न केला आहे. विदर्भातील निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
“काही लोकांना वावडं आहे की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे हे काही लोकांना सहन होत नाही. का शेतकऱ्याच्या मुलाने हेलिकॉप्टने फिरू नये? शेतकऱ्याच्या मुलाने चांगल्या गाडीतून फिरू नये? बंदी आहे का?”, असे प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केले.




हेही वाचा >> सुषमा अंधारे प्रकरणात संजय शिरसाटांना खरंच क्लीनचिट? रुपाली चाकणकर म्हणाल्या, “मिळालेल्या अहवालातून…”
“देवेंद्रजी तुम्हाला सांगू इच्छितो की, भिवंडीत एका शेतकऱ्याच्या मुलाने हेलिकॉप्टर विकत घेतलं आहे. म्हणून मी गावी जातो तेव्हा शेतीमध्ये रमतो. माती आणि आपल्यातील नातं कोणालाही नाकारता येणार नाही. शेवटी आपण मातीतील लोकं. म्हणून आम्ही दोघेही दिवसरात्र काम करत आहेत. मंत्रिमंडळ, अधिकारी दिवसरात्र काम करत आहोत”, असंही शिंदे म्हणाले.
“आज या कालव्यातून पाणी सोडलं जाईल. या ऐतिहासिक क्षणाचे आम्ही साक्षीदार आहोत. माझ्या जन्माअगोदर या प्रकल्पाला सुरुवात झाली असं फडणवीस म्हणाले. आता या कालव्यातून पाणी सोडण्याचा दिवस पाहतोय. या प्रकल्पासाठी अनेक चढ उतार पाहिले, सर्वांच्या सहकार्यातून या लोककल्याणाचा प्रकल्प साकार होतोय”, असंही या प्रकल्पाविषयी माहिती देताना एकनाथ शिंदे म्हणाले.