ज्या पद्धतीने भाजपची वाटचाल सुरू आहे आणि स्थानिक निवडणुकांमधून पडझड होताना दिसत आहे, त्यावरून केंद्रात यापुढे भाजपला निभ्रेळ बहुमत मिळणे अशक्य आहे, असे भाकित राज्याचे माजी महाधिवक्ता आणि विदर्भवादी नेते अॅड.श्रीहरी अणे यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना वर्तवले.
खालच्या पातळीवर त्या तुलनेत काँग्रेसचे चांगले काम आहे. भाजपने वेगळ्या विदर्भाच्या मागणीला समर्थन दिले आहे, पण केंद्रात बहुमताची सत्ता असूनही भाजप काहीच करताना दिसत नाही. आता त्यांच्या सत्ताकाळाची तीन वष्रे उरली आहेत. याच कालावधीत विदर्भवाद्यांना निर्णायक लढा म्हणजेच ‘शेवटाचा लढा’ उभारावा लागणार आहे.
वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीसाठी राज्याच्या संमतीची काहीच गरज नाही. केंद्रात दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली की, वेगळे राज्य निर्माण होऊ शकते. खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे याबाबतीत अज्ञान आहे. केंद्रात भाजपची बहुमताची सत्ता आहे. भाजपकडून आपण अपेक्षा ठेवत असू तर त्यांना आताच याबाबतीत निर्णय घ्यावा लागणार आहे. भाजपचे पुन्हा बहुमत येणे शक्य वाटत नाही. सत्ता आलीच तर ती आघाडीची असेल, त्यामुळे तीन वर्षच त्यांच्या हाताशी आहेत. १ जानेवारी २०१७ पर्यंत भाजपने वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत निर्णय घ्यावा अन्यथा, भाजपविरोधात आंदोलन करणे आम्हाला भाग पडेल, असा इशारा त्यांनी दिला.
अॅड. श्रीहरी अणे म्हणाले, शिवसेनेच्या धमक्यांना मी घाबरत नाही. मुळात शिवसेनेलाच वेगळ्या विदर्भाची भीती वाटत आहे. त्यांनी माझ्यावर दगड भिरकावले, तर त्याचे परिणाम त्यांनाही भोगावे लागणार आहेत. मुंबईत बसून विदर्भाकडे दगड भिरकावणे सोपे आहे, पण विदर्भातूनही दगड येऊ शकतात, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. हिंसक मार्गाने चळवळ चालावी, या मताचा मी नाही. शिवसेना नेत्यांना देशद्रोह, खंजीर, असे शब्द सामान्य नाण्यासारखे वाटतात. ते शब्द त्यांना वापरायला आवडतात. आपली त्यासाठी हरकत नाही. घटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर करणे, हा देशद्रोह कसा काय होऊ शकतो, असा सवाल त्यांनी केला. विचारांचे उत्तर विचाराने द्यायचे, अशी जर विदर्भविरोधी नेत्यांची भूमिका असेल, तर आपण उद्धव ठाकरे, राज ठाकरे, नितेश राणे यांना वेगळ्या विदर्भाविषयीची आपली भूमिका पटवून देऊ शकतो, असे ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 1st May 2016 रोजी प्रकाशित
भाजपला यापुढे बहुमत मिळणे अशक्य – अणे
ज्या पद्धतीने भाजपची वाटचाल सुरू आहे आणि स्थानिक निवडणुकांमधून पडझड होताना दिसत आहे
Written by लोकसत्ता टीम

First published on: 01-05-2016 at 01:14 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shrihari aney comment on bjp