अहिल्यानगर : साखर कारखान्यांसाठी लागणारी यंत्रसामुग्री तयार करणाऱ्या नगरच्या औद्योगिक क्षेत्रातील श्रीजी इंजिनीयरिंग उद्योगाला उत्कृष्ट निर्यातीबद्दल केंद्र सरकारच्या निर्यात विभागाकडून पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कार मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते व केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाचे सहसचिव विमल आनंद यांच्या उपस्थितीत श्रीजी ग्रुपचे संचालक सागर अग्रवाल यांनी तर पश्चिम महाराष्ट्राच्या पातळीवरील पुरस्कार राज्याच्या उद्योग विभागाचे सचिव जितेंद्रसिंह कुशवाह यांच्या हस्ते कंपनीचे निर्यात व्यवस्थापक जयन नायक यांनी स्वीकारला.
श्रीजी ग्रुपने यापूर्वी अमेरिका, कॅनडा, केनिया, युगांडा, नायजेरिया, सुदान, इंडोनेशिया, थायलंड, फिलिपाईन्स, फिजी आदी ४० देशांमध्ये साखर कारखान्यांना लागणाऱ्या यंत्रसामग्रीची निर्यात केली आहे. अमेरिकेसाठी बॉयलींग हाऊस व रिफाइंड शुगर यंत्रसामग्रीचा भारतातून पुरवठा करणारी श्रीजी ही एकमेव कंपनी असल्याचे संचालक दिनेश अग्रवाल यांनी सांगितले. भारतातील ३०० हून अधिक साखर कारखान्यांना श्रीजी ग्रुपमार्फत यंत्रसामग्रीचा पुरवठा केला जातो.
कंपनीने अलीकडेच साखर कारखाना व शेतीच्या कचऱ्यापासून बायो-सीएनजी यंत्रसामुग्री बनवण्याच्या प्रकल्प कार्यान्वित केला आहे. त्यासाठी जर्मन कंपनी समवेत तंत्रज्ञानाचा करार केला आहे व सीएनजी उत्पादनात सुरुवात केली आहे. श्रीजी ग्रुपची जबाबदारी गोपाल, अनिल व दिनेश अग्रवाल या तीन बंधुंच्या मार्गदर्शनाखाली नूतन संचालक सुदीप अग्रवाल, सागर अग्रवाल व सजल अग्रवाल सांभाळत आहेत.