सोलापूर : श्रीक्षेत्र अरण (ता. माढा) येथे श्री संत सावता माळी महाराजांच्या ७३० व्या पुण्यतिथीनिमित्त श्रीफळ हंडी सोहळा अपूर्व उत्साहात पार पडला. हा श्रीफळ हंडी फोडण्याचा मान परंपरेनुसार संत तुकाराम महाराजांचे वंशज देहूकर घराण्याकडे चालत आला आहे. यावेळी अन्न धान्य व पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यासह भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आदी उपस्थित होते.
राज्यातील विविध अनेक संतांच्या दिंड्या, पालखी पंढरपुरात आषाढी वारीत दाखल होतात. परंतु, विठ्ठलाची पालखी एकमेव संत सावता माळी महाराजांच्या भेटीसाठी अरणला येते. काल मंदिरात विठ्ठलाची पालखी दाखल झाली आणि भाविकांमध्ये मोठा उत्साह संचारला होता. यावेळी देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन झाले आणि त्यानंतर दहीहंडी कार्यक्रमाने दोन दिवसांच्या उत्सवाची सांगता झाली. यावेळी गावात भाविकांच्या गर्दीने जत्रेचे स्वरूप आले होते.
ज्ञानोबा माउली, तुकारामच्या जयघोषात टाळ मृदंगाच्या गजरात, तोफांची सलामी देत श्री संत सावता माळी पुण्यतिथी सोहळ्याचे श्रीफळ हंडी फोडण्याचा उत्सव पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी सावता माळी मंदिर परिसरासह संपूर्ण शिवार भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. श्रीफळ हंडीतील नारळ प्रसाद म्हणून घेण्याची पारंपरिक श्रद्धा जोपासली जाते. त्यासाठी तरुणाईने मोठी धडपड केली. पंढरपूरहून आलेली विठ्ठलाची पालखी आणि संत सावता महाराजांची पालखी यांच्यासमोर काल्याचे कीर्तन सुरू असताना शेवटी श्रीफळ हंडी फोडण्यात आली.
श्रीक्षेत्र अरण येथे संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंढरपूरहून आलेल्या विठ्ठलाची पालखी आणि संत सावता माळी यांची पालखी समोरासमोर आल्यानंतर काल्याचे कीर्तन होऊन श्रीफळ हंडी सोहळ्यास प्रारंभ झाला. यावेळी अन्न धान्य व पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यासह भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आदी उपस्थित होते.