सावंतवाडी : पक्षी जगतात अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा मास्कड बुबी हा समुद्री पक्षी मालवण येथील दांडी झालझुलवाडीच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळून आला आहे. समुद्राच्या लाटांबरोबर वाहून आलेल्या या थकलेल्या पक्षाला स्थानिक महिला सौ. जान्हवी जयदेव लोणे यांनी पाहिले आणि त्यांनी तो पक्षी सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले.

सोमवारी संध्याकाळी सौ. जान्हवी जयदेव लोणे आणि त्यांच्यासोबत असलेल्या कु. दिक्षा लोणे यांना समुद्राच्या लाटांमधून एक अनोखा पक्षी किनाऱ्याकडे वाहत येताना दिसला. जवळ जाऊन पाहिल्यावर तो पक्षी उडू शकत नव्हता. सौ. लोणे यांनी तातडीने युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेशी संपर्क साधला.

संस्थेचे सदस्य अक्षय रेवंडकर आणि इकोमेट्सचे सदस्य भार्गव खराडे यांनी घटनास्थळी त्वरित धाव घेतली आणि त्या पक्षाची ओळख मास्कड बुबी अशी पटवली. यानंतर त्यांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली.

संस्थेच्या कार्यालयात हा पक्षी सुरक्षित ठेवण्यात आला. संस्थेच्या उपाध्यक्ष स्वाती पारकर, अनिता पारकर आणि मनीषा पारकर यांच्या मदतीने पक्ष्याला पिंजऱ्यात ठेवण्यात आले. थकलेला असल्यामुळे तो आपल्या पंखात मान घालून विश्रांती घेत होता. यानंतर अक्षय रेवंडकर आणि भार्गव खराडे यांनी या दुर्मिळ पक्षाला वनविभागाच्या ताब्यात सुपूर्द केले.

जान्हवी लोणे यांच्या तत्परतेमुळे आणि युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेच्या सहकार्यामुळे या दुर्मिळ पक्ष्याचे प्राण वाचले. वनविभागाकडून या पक्षावर पुढील उपचार केले जातील.