दोडामार्ग तालुक्यात ६ हत्तींचा वावर, ओंकार हत्तीला पकडण्याचा मुहूर्त ठरेना

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात सध्या ६ हत्तींचा कळप फिरत आहे. हे हत्ती सध्या कोलझर वरून केरच्या दिशेने जात असून, वनविभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार हे हत्ती लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड परिसरात परत जाण्याची शक्यता आहे. या कळपात ‘ओंकार’ नावाचा एक हत्ती आहे, ज्याने मोर्ले येथे एका व्यक्तीला चिरडून ठार मारले होते. त्यामुळे त्याला पकडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला पकडण्याचा मुहुर्त ठरत नसल्याने शेतकऱ्यांचा रोष व्यक्त होत आहे.

यापूर्वी जून महिन्यापर्यंत ओंकारला पकडण्याचा निर्णय झाला होता, मात्र पावसाळ्यामुळे त्याला पकडण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे हत्तीला पकडण्याची मोहीम अद्याप सुरू झालेली नाही. उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार हत्तीला पकडण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती आणि त्यांनी आपला अहवाल सादर केला आहे. पावसाळा संपल्यावर ओंकारला पकडण्याचा प्रयत्न केला जाईल.

या कळपातील इतर पाच हत्तींनी बागायती पिकांचे नुकसान केले असले, तरी त्यांनी मनुष्याला कोणतीही इजा पोहोचवलेली नाही. त्यामुळे त्यांना पकडण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही.

गवा आणि बिबट्यांचाही धुमाकूळ

सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ हत्तीच नव्हे, तर गवा आणि बिबट्यांचाही त्रास वाढला आहे. गवा रेड्याचे कळप पाळीव गुरांसारखे लोकवस्तीजवळ चारा खाताना दिसत आहेत, ज्यामुळे वाहनांचे अपघात होत आहेत आणि त्यात माणसे जखमी झाली आहेत. दुसरीकडे, बिबटे लोकवस्तीत घुसून पाळीव प्राण्यांना मारत आहेत.

याशिवाय माकडांनीही धुमाकूळ घातला आहे. माकडे शेती मध्ये घुसून बागायतींचे नुकसान करत आहेत. लाल तोंडाच्या माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी पकड मोहीम राबवण्यात आली होती, तरीही माकडे लोकवस्तीत येतच आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वन्य प्राणी लोकवस्तीत का येत आहेत?

या सर्व प्रकारांमुळे शेतकरी आणि बागायतदार त्रस्त झाले आहेत. वन्य प्राणी लोकवस्तीकडे येण्याची कारणे म्हणजे जंगलात पाण्याची सोय, अन्न सुरक्षा आणि नैसर्गिक भक्षकांची कमतरता. त्यामुळे वन्य प्राणी अन्नाच्या शोधात शेतीत आणि बागायतींमध्ये शिरत आहेत, असे तज्ञांचे मत आहे. उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी सांगितले की, रस्ते ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी माहिती फलक लावण्यात आले आहेत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने अशा ठिकाणी स्पीड ब्रेकर लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.