​सावंतवाडी: ​गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची पातळी मोठ्या वेगाने वाढत आहे. सध्या धरण ९८.७६ टक्के भरले असून, जलसंपदा विभागाने पुन्हा एकदा धरणाचे सांडवे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तिलारी नदीपात्रातील पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

​२३ सप्टेंबरला धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते, तेव्हा पाण्याची पातळी ११२.३६ मीटर होती. मात्र, त्यानंतरही दोडामार्ग तालुक्यात आणि पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच राहिली. २७ सप्टेंबर रोजी धरण ९७.४३ टक्के भरून पाण्याची पातळी ११२.४५ मीटर झाली होती. आज सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत धरण ९८.७६ टक्के भरले असून, पाण्याची पातळी ११२.८२ मीटर इतकी झाली आहे.

​केवळ दोन दिवसांत धरणाच्या साठ्यात ५.८१२ द.ल.घ.मी. पाण्याची भर पडली आहे. या वेगाने पाणी वाढत राहिल्यास १९ ऑक्टोबरपर्यंत नियोजित असलेला १०० टक्के भराव यापूर्वीच गाठला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

​परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने तातडीने निर्णय घेतला आहे. खळग्यातील दगडी धरणाचे सांडवे येत्या १२ तासांत कधीही उघडण्याचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे. यावेळी अतिरिक्त पाणी नियंत्रित पद्धतीने पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीत सोडले जाणार आहे. यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार असल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.