सोलापूर : प्रख्यात सिने पार्श्वगायिका आशा भोसले यांनी मंगळवारी सायंकाळी अक्कलकोट येथे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांच्या देवस्थानात येऊन सश्रद्ध भावनेने दर्शन घेतले. त्यांच्या समवेत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार हे उपस्थित होते.

आशा भोसले यांनी नुकतीच वयाची ९१ वर्षे पूर्ण केली आहेत. त्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारात दर्शनासाठी रुजू झाल्यानंतर त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचा नामजप केला. पहाडी आणि तेवढ्याच रेशीम आवाजात त्यांनी राग आळवला. तेव्हा मंदिरातील वातावरण भक्तिमय आणि तेवढेच चैतन्यमय बनले होते. यावेळी आशा भोसले यांच्या समवेत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार व त्यांच्या कुटुंबीयांसह अन्य मंडळी उपस्थित होती. मंदिराचे पुरोहित मंदार पुजारी यांनी पौरोहित्य केले. यावेळी श्री स्वामी समर्थ देवस्थान समितीच्यावतीने प्रथमेश इंगळे यांनी आशा भोसले आणि आशिष शेलार यांचा श्री स्वामी समर्थांची प्रतिमा, महावस्त्र आणि प्रसाद देऊन सत्कार केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर शेजारच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळासही आशा भोसले यांनी भेट दिली. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले, प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले आणि सचिव श्याम मोरे यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाशी मंगेशकर कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दिवंगत गानकोकिळा लता मंगेशकर यांनी काही वर्षांपूर्वी अन्नछत्र मंडळास स्वतःच्या मालकीच्या दोन आलिशान मोटारी भेट दिल्या होत्या. या दोन्ही मोटारी अन्नछत्र मंडळाच्या परिसरात लतादीदींची आठवण म्हणून जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.