अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन केलं आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी कक्षात ही घटना घडली ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे सगळे शेतकरी बाळापूर तालुक्यातले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरच्या विस्तारीकरणात शेती गेली. त्याचा मोबदला देण्यास टाळाटाळ होत असल्याने आमच्यापुढे विषप्राशनाशिवाय पर्याय नसल्याचे या शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
साजिद इकबाल शेख मेहमूद, अफजल रंगारी, मुरलीधर राऊत, अर्चना टकले, आशिष हिवरकर, अबरार अहमद, रोशन अहमेद अशी या शेतकऱ्यांची नावं आहेत. विष प्राशन केल्याने या शेतकऱ्यांची प्रकृती गंभीर आहे. या सगळ्या शेतकऱ्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या कक्षात त्यांच्यासमोरच हा प्रकार घडला आहे. दुपारी चा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सगळे शेतकरी बाळापूर तालुक्यात कान्हेरी गवळी, शेळद आणि व्याळा गावातले आहे. धुळे, कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरच्या विस्तारीकरणात या सगळ्यांची शेती गेली आहे.
या सगळ्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जाते आहे. गेल्या दोन वर्षांपासून या शेतकऱ्यांचा सरकारसोबत संघर्ष सुरु आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देणार नसल्याचं पत्र दिलं. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी विष प्राशन केलं.