पिंजऱ्यात जेरबंद असलेल्या चार बिबटय़ांच्या पालनपोषणाचा रोजचा खर्च पाच ते सहा हजार रुपये असून १२ ते १५ किलो मटणाचा पाहुणचार द्यावा लागत आहे. दरम्यान, या बिबटय़ांना इतरत्र सोडण्यात यावे, असा प्रस्ताव वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नकवी यांनी पाठविला आहे.
 ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात धुमाकूळ घालणाऱ्या बिबटय़ांनी आतापर्यत ९ लोकांचा बळी घेतला आहे. या नरभक्षक बिबटय़ाला गोळय़ा घाला किंवा जेरबंद करण्याचे निर्देश नकवी यांनी देताच पिंजरे लावून एकापाठोपाठ एक असे तीन बिबटे जेरबंद करण्यात आले. यातील तीन बिबटे मोहुर्ली येथील प्राणी बचाव केंद्रात, तर एक बिबटय़ा रामबाग नर्सरी येथे ठेवण्यात आले आहेत. मोहुर्ली येथील एक बिबटय़ा जवळपास एक वर्षांपासून पिंजऱ्यात बंदिस्त आहे. त्यामुळे आता या बिबटय़ाला जंगलात सोडले तरी शिकार करता येणार नाही अशी त्याची अवस्था झाली आहे. उर्वरित तीन बिबटय़ांपैकी एकाचे दात पूर्णत: खराब झाले आहेत. त्यामुळे त्याचाही शिकारीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशा स्थितीत वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नकवी यांनी बिबटय़ांना इतरत्र सोडण्यात यावे, असा प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला वरिष्ठ पातळीवरून सकारात्मक उत्तर आले नसल्याने बिबटे पिंजऱ्यातच आहे. त्यामुळे पिंजऱ्यात अडकून पडलेल्या या बिबटय़ांच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी वन खात्यावर आली आहे. चार बिबटय़ांना दररोज १२ ते १५ किलो मटण द्यावे लागत आहे. या चार बिबटय़ांचा रोजचा खर्च जवळपास पाच ते सहा हजार रुपये आहे. सकाळी उन्हामुळे बिबटे मास खात नसले तरी त्यांना रोज सायंकाळी मटणाचा पाहुणचार करावा लागतो.
एक बिबटय़ा जवळपास तीन ते चार किलो मटण फस्त करतो. यासोबतच चारही बिबटय़ांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून नियमित वैद्यकीय तपासणी करावी लागते. डॉ. कडूकर व नागपूरच्या डॉ. चित्रा राऊत या वैद्यकीय तपासणी करतात. आजदेखील या चारही बिबटय़ांची रक्ताची तपासणी करण्यात आली. यासोबतच छोटय़ा पिंजऱ्यात शरीराची हालचाल करणे कठीण होत असल्याने पिंजऱ्याच्या गजांवर आपटून बिबटे जखमी झाले आहेत. त्यामुळे या जखमांची तपासणीसुद्धा करावी लागते. बिबटय़ांच्या पिंजऱ्यात पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून गर्मी होऊ नये व उन्हापासून बचाव करण्यासाठी म्हणून त्यांना हिरव्या जाळीच्या कापडाने झाकून ठेवण्यात आले आहे. दररोज तीन ते चार कर्मचारी या बिबटय़ांच्या सेवेत आहेत.  जोपर्यंत बिबटे निसर्गमुक्त होणार नाही, तोपर्यंत तरी वन अधिकाऱ्यांच्या नाकात बिबटय़ांनी दम आणला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six thousand daily expenditure on martingale leopard
First published on: 09-05-2013 at 04:00 IST