Sohrabuddin Sheikh Encounter case: सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमक प्रकरणी मुंबईतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला असून सर्व 22 आरोपींना सबळ पुराव्या अभावी दोषमुक्त करण्यात आले आहे. सरकारी पक्षाला समाधानकारक आणि ठोस पुरावे सादर करण्यात अपयश आले, असे ताशेरे न्यायालयाने ओढले.
सोहराबुद्दीन शेख आणि त्याची बायको कौसर बी तसेच या प्रकरणातील मुख्य साक्षीदार तुलसीराम प्रजापती या तिघांना चकमकीत ठार मारण्यात आले होते. 2005 मध्ये सोहराबुद्दीन व त्याच्या पत्नीचा चकमकीत मृत्यू झाला होता. तर 2006 मध्ये तुलसीराम प्रजापतीचा चकमकीत मृत्यू झाला होता. प्रजापती हा सोहराबुद्दीन चकमक प्रकरणातील साक्षीदार होता. या प्रकरणी मुंबईतील सीबीआयच्या विशेष न्यायालयात खटला चालवण्यात आला. शुक्रवारी या खटल्यात न्यायालयाने निर्णय दिला. सर्व 22 आरोपींना न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी दोषमुक्त केले.
‘सरकारी यंत्रणा आणि वकिलांनी अथक मेहनत घेतली, 210 साक्षीदारांना हजर करण्यात आले. पण समाधानकारक आणि ठोस पुरावे सादर करण्यात सरकारी पक्षाला अपयश आले. तसेच साक्षीदारांनीही साक्ष फिरवली. साक्षीदारच जर बोलणार नसतील तर यात सरकारी वकिलांची चूक नाही’, असे मत न्यायालयाने निकाल देताना नोंदवले.
काय आहे प्रकरण?
सोहराबुद्दीन आणि त्याची बायको कौसर बी यांना गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने पकडल्याचा ठपका होता. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी सोहराबुद्दीनचे संबंध असल्याचा दावा गुजरात पोलिसांनी केला होता. नोव्हेंबर २००५ मध्ये सोहराबुद्दीनला गांधीनगरजवळ एका चकमकीत ठार मारण्यात आले. या बनावट चकमकीचे नियोजन करण्यात गुजरातचे तत्कालीन गृह राज्यमंत्री अमित शहा यांचा सहभाग होता, असा आरोप होता. डिसेंबर २०१४ मध्ये न्यायालयाने अमित शहा यांना या प्रकरणातून आरोपमुक्त केले होते.