सोलापूर : बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल विठ्ठलराव सरवदे (वय ६५) यांचे हृदयविकाराने बुधवारी सकाळी सोलापुरात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी जुना पुणे चौत्रा नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो जनसमुदायाने शोकाकूल वातावारणात दिवंगत नेत्याला अखेरचा निरोप दिला.

कुशल संघटक राहुल सरवदे हे लढवय्ये, स्पष्टवक्ते आणि धडाडीचे नेते होते. बसपाच्या स्थापनेपासून सरवदे यांनी पक्षाचे संस्थापक कांशीराम आणि राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांच्यासोबत निष्ठेने काम करताना महाराष्ट्रासह आंध्र, तेलंगणा, कर्नाटक आदी राज्यांचे प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळली होती. काही काळ ते पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. ‘एक पक्ष, एक झेंडा, एक नेता’ अशी त्यांची ओळख होती. सोलापुरात बसपाची स्थापना करून महापालिकेत प्रथमच चार नगरसेवक निवडून पाठविण्यात राहुल सरवदे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी सोलापूर आणि माढा लोकसभा निवडणूकही लढविली होती.

हेही वाचा – मनुस्मृती दहन आंदोलनात आव्हाडांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोची विटंबना केल्याचा भाजपाचा आरोप; आव्हाडांनी स्पष्ट केली भूमिका!

हेही वाचा – पैसे वाटल्याच्या आरोपानंतर मुख्यमंत्री शिंदेंची संजय राऊतांना कायदेशीर नोटीस; राऊत म्हणतात, “अब आयेगा मजा..”

बुधवार पेठेतील मिलिंद नगरात राहणारे राहुल सरवदे हे किशोरवयीन काळापासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय होते. १९७८ सालच्या मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर ते बामसेफसह कांशीराम यांच्या नेतृत्वाखालील ‘डीएस-४’ चळवळीकडे ओढले गेले. सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र, एक कन्या, भाऊ असा परिवार आहे.