सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या प्रसूतिगृहात दाखल होण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना खासगी प्रसूतिगृहात नेल्याच्या आरोपावरून ४९ आशा सेविका अडचणीत आल्या आहेत. तर महापालिका आरोग्य विभागाने संबंधित खासगी प्रसूतिगृहाचे सर्व दफ्तर ताब्यात घेत त्याला टाळे ठोकले आहे.

नव्या पेठेतील या खासगी प्रसूतिगृहास महापालिका आरोग्याधिकारी डॉ. राखी माने यांनी टाळे ठोकले आहे. यासंदर्भात संबंधित प्रसूतिगृहाला पाठविण्यात आलेल्या नोटिशीचे उत्तर मिळाले नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. आणखी वैद्यकीय परवानाही निलंबित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणात महापालिकेच्या ४९ आशा सेविका अडचणीत सापडल्या आहेत. एका रुग्णामागे दोनशे रुपये मिळण्याच्या आमिषाने आशा वर्कर्स सापडल्या आहेत.

दरम्यान, महापालिकेच्या प्रसूतिगृहामधील रुग्ण पळविण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून ४९ आशा सेविकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येत आहेत. ही कारवाई महापालिका प्रशासनाने घाईघाईने करू नये. अन्यथा महापालिका आवारात समस्त आशा वर्कर्स ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा आशा वर्कर्स संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पुष्पा पाटील यांनी दिला आहे. नव्या पेठेतील एका प्रसूतिगृहात काही पाकिटे सापडली होती. या पाकिटावर काही आशा सेविकांची नावे नमूद होती. परंतु एकाही आशा सेविकेने पैसे स्वीकारले नाहीत. तरीही योग्य चौकशी होण्याची वाट न पाहता त्यांना गुन्हेगार ठरविण्याची घाई केली जात आहे. दुसरीकडे महापालिका दवाखान्यात सेवा बजावण्याऱ्या काही डॉक्टरची खासगी रुग्णालये आहेत. मग त्यांच्यावर कारवाई करता येत नाही का? असा सवाल आशा वर्कर्स संघटनेच्या जिल्हाध्यक्षा पुष्पा पाटील यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.