सोलापूर : थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सावकाराने पाचजणांना एका व्यापाऱ्याच्या खुनाची सुपारी दिली. त्यातूनच हल्लेखोरांनी संबंधित व्यापाऱ्यावर पिस्तुलाने गोळीबार करून कोयत्यानेही हल्ला केल्याची घटना माढा तालुक्यातील टेंभुर्णी गावात घडली आहे. याप्रकरणीसंबंधित सावकारासह इतरांविरूध्द टेंभुर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

राहुल महादेव पवार (वय ३५, रा. टेंभुर्णी) असे या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्याने स्वतःची आर्थिक अडचण सोडविण्यासाठी श्रीरंग रमेश थोरात नावाच्या खासगी सावकाराकडून १२ लाख कर्ज घेतले होते. परंतु कर्जाचे हप्ते व्याजासह देऊनसुध्दा कर्जाची थकबाकी राहिल्याने श्रीरंग थोरात याने पाचजणांना राहुल पवार यांच्या खुनाची सुपारी दिली होती. राहुल पवार हे सायंकाळी आपल्या जगदंब व्हेजिटेबल दुकानात बसले असताना मोटारीतून आलेल्या पाचजणांनी खून करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर हल्ला केला. एकाने पिस्तुलातून गोळीबार केला. तर दुस-याने कोयत्याने त्यांच्या डोक्यात प्रहार केला.

हेही वाचा…सातारा : महाबळेश्वर प्रतापगड रस्त्यावर टेम्पो दरीत कोसळून चार जखमी

जखमी अवस्थेत रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी दिलेल्या मृत्युपूर्व जबाबानुसार श्रीरंग थोरात व इतर साथीदारांविरूध्द खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपासह महाराष्ट्र सावकारी नियमन कायदा, अग्निशस्त्र अधिनियम कायद्याखाली टेंभुर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याच्या पध्दतीचे निरीक्षण नोंदविले.