सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या बांधकाम परवाना विभागात बोगस बांधकाम परवाने देऊन केलेल्या घोटाळ्यात अडकलेले दोन अभियंते आणि एका लिपिकाचा जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन अर्ज मंजूर केला. दरम्यान, या घोटाळ्यातील चौथा आरोपी असलेल्या अवेक्षक शिवशंकर बळवंत घाटे यास अटक झाली असून पोलीस कोठडीनंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
उपअभियंता झाकीर हुसेन अल्लाबक्ष नाईकवाडी (वय ५८, रा. ए स्केअर अपार्टमेंट, बसवेश्वरनगर, सोलापूर), कनिष्ठ अभियंता श्रीकांत बसण्णा खानापुरे (वय ५८) आणि लिपिक आनंद क्षीरसागर (वय ५२) अशी जामिनावर मुक्तता झालेल्या आरोपींची नावे आहेत. जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या काळात एकूण ९६ प्रकरणांमध्ये पालिका बांधकाम परवाना विभागातील अभियंते झाकीरहुसेन नाईकवाडी, श्रीकांत खानापुरे, अवेक्षक शिवशंकर घाटे आदींनी संगनमत करून बांधकामांचे नकाशे मंजूर करण्याचे अधिकार आपणास नाहीत, हे माहीत असूनही अनाधिकाराने खोटे आणि बनावट बांधकाम परवाने संबंधित मिळकतदारांना वाटप केले होते. अशी ९६ प्रकरणे होती.
नंतर जाणीवपूर्वक संबंधित कागदपत्रे नष्ट करून किंवा कोठेतरी विल्हेवाट लावून महापालिकेचे सुमारे दोन कोटी १० लाख ३० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याचे सदर बझार पोलीस ठाण्यात महापालिका बांधकाम परवाना विभागातील उपअभियंता नीलकंठ मठपती यांनी २५ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते. अवेक्षक घाटे वगळता इतर आरोपी मागील साडेतीन महिन्यांपासून अटकेत होते. जामीन अर्जावरीलं सुनावणीत अर्जदारांतर्फे ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. शशी कुलकर्णी व ॲड. विनोद सूर्यवंशी यांनी तर सरकारतर्फे ॲड. दत्ता पवार यांनी काम पाहिले.