सोलापूर : सोलापूर महापालिका आणि एमआयटी महाविद्यालयात यांच्यात पालिका आयुक्तांच्या दालनात कत्रिम बुध्दिमत्ता अर्थात, एआय या आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सामंजस्य करार झाला. या कराराचा उद्देश शैक्षणिक, महापालिकेचे विविध विभाग व शासकीय क्षेत्रात एआयचा प्रभावी वापर करून शहरी प्रशासन अधिक सक्षम करणे हा आहे.
या करारानुसार एमआयटी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि संशोधक सोलापूर महापालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये एआय आधारित संशोधन व अंमलबजावणी करतील. यामध्ये डेटा विश्लेषण, नागरी सेवा सुधारणा, स्मार्ट सिटी उपाययोजना, कचरा व्यवस्थापन, घंटा गाडी, पाणी पुरवठा,वाहतूक नियमन इत्यादी क्षेत्रांचा समावेश राहील.
या सामंजस्य करारावर महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे व एमआयटी महाविद्यालयाचे उपनिबंधक डॉ प्रणेश मुरनल व प्रा. आनंद शिंपी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी पालिकेचे मुख्यलेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर, सहायक आयुक्त शशिकांत भोसले, नगर सचिव प्रवीण दंतकाळे, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, संगणक प्रोग्रामर स्नेहल चफळगावकर, मतीन सय्यद आदी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव प्राप्त होणार असून, सोलापूर महापालिकेच्या तांत्रिक क्षमतेत वाढ होणार आहे. आगामी काळात शहर प्रशासनात एआयचा समावेश करून नागरिकांना जलद व प्रभावी सेवा देण्याच्या दृष्टीने हा करार मैलाचा दगड ठरणार आहे, असे आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी यावेळी बोलताना सांगितले. सोलापूर महानगरपालिकेत सध्या मनुष्यबळ अपुरे असल्याचे बोलले जाते. अधिकारी भरपूर झाले आहेत. पण त्यातुलनेत कर्मचारी संख्या अपुरी असल्याचे म्हटले जाते. त्याचा परिणाम महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर होतो.
दुसरीकडे शहरात अवैध आणि बेकायदा बांधकामे खूप आहेत. त्यावर नियंत्रण ठेवताना नेहमीच कमी मनुष्यबळाचे कारण सांगितले जाते. त्यामुळे बेकायदा बांधकामावर कोणाचेही नियंत्रण नसते. नव्या पेठेसारख्या शहरातील मोक्याच्या ठिकाणी एकीकडे १९७८ हालचाल मास्टर प्लॅन अजून अंमलबजावणी दूर असताना त्यासाठी पैशाची अडचण सांगितली जाते. त्यावर उतारा म्हणून येथे रस्ता मोठा करण्यासाठी बांधकामांच्या ठिकाणी वाढीव चटई क्षेत्र दिले जाते. पण या वाढीव चटई क्षेत्रावरही कोणाचे नियंत्रण नसते.
दुसरीकडे समोरचा आहे तो रस्ता मोकळा न सोडता आहे त्या जागेवर बेकायदा बांधकामे होतात. त्याकडे बांधकाम परवाना विभागासह अन्य विभागांचे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली तर त्यावर जुजबी कारणे दिली जातात. परंतु एआयचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर जर खरोखरच झाला तर अशा बेकायदा बांधकामांना काणाडोळा न करता कारवाई करणे भाग पडणार आहे. प्रश्न एआयचा खरोखरच मनापासून वापर होण्याचा आहे. केवळ बेकायदा बांधकामेच नव्हे तर घनकचरा संकलनापासून ते वाहतूक नियंत्रणापर्यंत अनेक समस्या सुटण्यास मदत होणार आहे. त्यासाठी सर्व प्रथम महापालिकेतील इच्छाशक्ती आणि वाढती खाबुगिरीला पायबंद घालावा लागणार आहे.