सोलापूर : सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात मोठी भरती झाल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षाच्या बांधणीचे काम जोरात सुरू असतानाच अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आणि त्यातून वेळीच तोडगा न निघाल्याने पक्षाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांनी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. वादग्रस्त माजी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे बंधू असलेल्या प्रा. शिवाजी सावंत यांचे पक्षात जमेनासे झाले होते.
डॉ. तानाजी सावंत हे अलीकडे पक्षश्रेष्ठींपासून दुरावले होते. तसा संदेश देण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर डॉ. सावंत हे आजारी पडल्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात त्यांची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर इकडे सोलापूर जिल्ह्यात पक्षात आपणास न विचारताच परस्पर पदे दिली जात आहेत.
एवढेच नव्हे, तर स्वतःच्या माढा तालुक्यातील तालुकाप्रमुख आणि शहरप्रमुख ही पदेही परस्पर नियुक्त केली जात आहेत. यात पक्षश्रेष्ठींना शिष्टमंडळाने भेटून गाऱ्हाणे मांडले. परंतु तरीही त्याकडे दुर्लक्ष करून मला डावलून पदभरती सुरूच आहे. त्यामुळे आता मला जिल्हा संपर्कप्रमुख या पदावर बसणे शक्य नाही, असे प्रा. सावंत यांनी सांगितले.
प्रा. सावंत हे गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा संपर्कप्रमुखपदी कार्यरत होते. परंतु त्यांचे सुरुवातीपासून माढा विभागप्रमुख महेश चिवटे यांच्याशी जमत नव्हते. त्यातच चिवटे यांनी पक्षाचे सचिव संजय मशीलकर यांचे दौरे वाढविले होते. त्यापासून जिल्हाप्रमुख प्रा. शिवाजी सावंत हे दूरच होते. त्यात अलीकडे माढ्यात संजय कोकाटे हे शिवसेना शिंदे गटात आले आणि ते हळूहळू सावंतांविरोधात मोर्चेबांधणी करू लागले. यातूनच त्यांना न विचारताच तालुकाप्रमुख आणि शहरप्रमुखपदे भरली जाऊ लागली. यासाठी माढा तालुक्यातील संबंध नसलेले सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक महेश साठे यांनीच पुढाकार घेतला होता. त्यांच्याच उपस्थितीत माढ्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची प्रा. सावंत यांना डावलून बैठक झाली आणि त्यात मोठा फेरबदल करण्यात आला.
महेश साठे यांनी यापूर्वी अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेसचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांना शिवसेनेत आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानंतर ते चर्चेत आले होते. आश्चर्य म्हणजे त्या वेळी जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत हे कोठेही नव्हते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात पास मिळण्यासाठी प्रा. सावंत यांना स्वतः वेगळे प्रयत्न करावे लागले होते.
एवढेच नव्हे, तर गेल्या विधानसभा सोलापूर शहर मध्यच्या हक्काच्या जागेवर शिवसेना शिंदे पक्षाकडून प्रा. शिवाजी सावंत यांनी उभे राहण्याची तयारी केली होती. परंतु ही जागा भाजपने काढून घेत त्या मोबदल्यात बार्शीचे पूर्वाश्रमीचे भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना शिवसेनेत पाठवून बार्शीची जागा शिवसेनेला देण्यात आली. यात प्रा. सावंत यांचा स्वप्नभंग झाला. हे कारस्थान रचण्यातही शिवसेनेतील एक गट सक्रिय होता, असे बोलले जाते.
या सर्व घडामोडींमध्ये ‘काय डोंगार, काय झाडी… समदं ओक्केमंदी’ या खास माणदेशी संवादामुळे देशभर चर्चेत राहिलेले सांगोल्याचे माजी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील हे कोठेही दिसत नाहीत.