सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात यंदाच्या दमदार पावसामुळे दहा दिवसांत दहा टक्के पाणीसाठा वधारला आहे. सध्या उजनीच्या पाणलोट क्षेत्रासह भीमा खोऱ्यात पाऊस मंदावला आहे.
गतवर्षी अत्यल्प पाऊसमान झाल्यामुळे ऑक्टोबरपर्यंत उजनी धरण जेमतेम ६०.६६ टक्क्यांपर्यंत भरले होते. नंतर पाणी वाटप नियोजनाचे तीनतेरा वाजले आणि हिवाळ्यातच म्हणजे जानेवारी महिन्यातच धरणातील पाणीसाठा मृत पातळीत गेले होते. एकूण १२३ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या या धरणातील ६३ टीएमसी पाणी मृत साठा मानला जातो. या मृत साठ्यातील पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागतो. विशेषतः या मृत साठ्यातील पाणी शेती व उद्योगासाठी न सोडता केवळ पिण्यासाठी राखून ठेवणे बंधनकारक असते. परंतु यंदा धरणातून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडताना ४० टक्क्यांच्या वर मृत पाणीसाठा खालावला होता. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्याची स्थिती गंभीर होऊन गेल्या ७ जूनपर्यंत तब्बल ६६ टक्क्यांपर्यंत मृत पाणीसाठा खालावला होता.
या पार्श्वभूमीवर यंदाच्या पावसाळ्यात सुदैवाने पावसाची दमदार सुरुवात झाली आहे. ७ जूनपासून गेल्या १० दिवसांत धरणातील पाणीसाठा १० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. रविवारी धरणात एकूण पाणीसाठा ३७.४३ टक्के तर उपयुक्त पाणीसाठा वजा २६.२४ टक्के होता. तर पाणीसाठ्याची टक्केवारी वजा ४८.९८ टक्के होती. भीमा खोऱ्यातून धरणात येऊन मिसळणाऱ्या पाण्याचा विसर्ग आठ हजार क्युसेकवरून कमी होऊन आता केवळ ३२४८ क्युसेकपर्यंत झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत १४८ मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे.