सोलापूर : चालू मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सातत्याने पडणाऱ्या पावसाच्या जोरावर उजनी धरणात पाणीसाठा लक्षणीय स्वरूपात वधारला आहे. मात्र, धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह भीमा खोऱ्यात पाऊस मंदावला असताना गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत धरणात तीन टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.

या संदर्भात जलसंपदा विभागाकडून जिल्हा प्रशासनामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, काल, बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उजनी धरणात एकूण पाणीसाठा ७०.५९ टीएमसी, तर उपयुक्त पाणीसाठा ६.९३ टीएमसी (१२.९३ टक्के) होता. धरणात दौंड येथून २३ हजार ५०१ क्युसेक विसर्गाने पाण्याची आवक होत होती. गुरुवारी पहाटे सहा वाजता ती कमी होऊन १५ हजार क्युसेकपर्यंत झाली. आणि सायंकाळी सहा वाजता ही आवक जवळपास निम्म्याने घटून १२ हजार ११८ क्युसेकपर्यंत झाली. त्यामुळे धरणात पाणीसाठा वाढण्याचा वेग मंदावला. सायंकाळी धरणात ७३.६९ टीएमसी इतका एकूण पाणीसाठा होता. उपयुक्त पाणीसाठा १०.६३ टीएमसीवर स्थिर झाला होता. धरणातील उपयुक्त पाण्याची टक्केवारी १८.७२ वर पोहोचली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दि. २१ मे रोजी धरणातील पाणीसाठा मृत पातळीत वजा २२.९३ टक्के एवढा खालावला होता. नंतरच्या नऊ दिवसांत त्यात लक्षणीय वाढ होऊन सुमारे ४१ टक्के पाणीसाठा जमा झाल्याचे दिसून येते.