सोलापूर : एका विवाहितेबरोबर अनैतिक संबंध ठेवल्याचा राग मनात भरून एका तरुणाचा खून करण्यात आला. मंगळवेढा तालुक्यातील मारोळी गावात पहाटे हा प्रकार घडला. संबंधित विवाहितेचा पती आणि दीर या दोघांविरुद्ध मंगळवेढा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सागर मनोहर इंगोले (वय २९, रा. सलगर बुद्रुक, ता. मंगळवेढा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील मनोहर अभंग इंगोले (वय ५६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मृत मुलगा सागर याचे मारोळी गावात मोबाइल शॉपी दुकान होते. त्याच्याकडे संबंधित विवाहित महिला मोबाइल रिचार्ज आणि दुरुस्तीसाठी अधूनमधून जायची. यातून त्यांच्यात सलगी होऊन त्याचे रूपांतर प्रेम प्रकरणात झाले. त्याची वाच्यता संबंधित विवाहितेच्या घरी झाली असता तिचा पती आणि दीर या दोघांचा सागरवर राग होता.

दरम्यान, सागर हा पहाटे चारच्या सुमारास संबंधित विवाहितेच्या घरासमोर दिसल्यामुळे तिच्या पतीने आणि दिराने त्यास तेथेच जागेवर पकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. नंतर काठीनेही त्याच्या तोंडावर, डोक्यावर, पाठीवर आणि इतरत्र सर्वांगावर मारहाण केली. यात सागर हा गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. त्यास रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.दरम्यान, दुग्धव्यावसायिक असलेले सागरचे वडील मनोहर इंगोले हे सकाळी सहाच्या सुमारास दूध घालण्यासाठी जात असताना वाटेत त्यांना आपला मुलगा सागर याचा खून झाल्याचे समजले. त्यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.